माता न तू वैरिणी...! एक लाख रुपयांसाठी आईने पोटच्या मुलाला विकले, पुण्यातील घटना
Pune Crime News : ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Pune Crime News : ‘माता न तू वैरिणी‘ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला एक लाख रुपयांसाठी विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार वर्षाच्या मुलाला विकल्यानंतर आईने पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती उघड झाली. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना झाली, या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरातून एका चार वर्षीय चिमुरड्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या आईने दिली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर तपासाला सुरुवातही केली. पण या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. या मुलाच्या आईनेच एक लाख रुपयांत या मुलाची विक्री केल्याचे निष्पन्न झाले. इतकेच नाही तर आईने ज्या व्यक्तीला हा मुलगा विकला होता, त्याने आणखी एका व्यक्तीला त्या मुलाची विक्री केल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आठ जणांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आईने तक्रार दाखल झाल्यानंतर गांभीर्य लक्षात घेऊन तपास आधिक वेगाने सुरु केला. कोथरुड, वारजे आणि उत्तमनगर पोलीस ठाण्यामार्फत 9 तपास पथकांमार्फत चिमुरड्याचा शोध सुरु केला. अपहरण झालेला मुलगा त्याच दिवशी बांगडीवाली भाभीसोबत (जन्नत बशीर शेख) होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन तपास सुरु केला. तिची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्या महिलेनं उडवाउडवीची उत्तरे दिली. पण खाकी दाखवल्यानंतर ती सर्व काही बरळली. ही चौकशी सुरु असताना दुसऱ्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्येही एक महिला मुलाला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या महिलेची कसून चौकशी केली. त्यावेळी तीने गुन्ह्याची कबूली दिली.
जन्नत बशीर शेख हिने सांगितले की, रेश्मा सुतार आणि तक्रार करणारी प्रियंका पवार यांच्या संगणमत व कट करुन चिमुकल्याचे अपहरण केलं. हा मुलगा तुकाराम निंबळे, मावळ याच्या मध्यस्थीने पनवेलमधील चंद्रकला माळी आणि भानुदास माळी यांना एक लाख रुपयांना विकला. पोलिसांनी तात्काळ जन्नत या दोघांचा शोध घेतला. पनवेल पोलिसांशी संपर्क साधत पुढील कारवाई ठरवली. पेनवेल पोलिसांनी तात्काळ चंद्रकला माळी आणि भानुदास माळी या दोघांना ताब्यात घेत मुलांबाबत विचारपूस केली. हा मुलगा एक लाख साठ हजार रुपयांना दिपक तुकाराम म्हात्रे, रायगड यांना विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रायगडमध्ये जात आरोपीला ताब्यात घेतलं अन् मुलाची सुटका केली. पोलिसांनी भादवि कलम 370, 368, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. तसेच आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असतान 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. यामध्ये आणखी कुणाचा हात आहे का? हे रॅकेट किती मोठं आहे... याबाबत पोलिस तपास करत आहेत.