(Source: Poll of Polls)
MVA Vajramuth Sabha: दादा येणार... दादा बोलणार आणि दादा जिंकणार; वज्रमूठ सभेत संजय राऊतांनी उधळली अजित पवारांवर स्तुतीसुमने
Sanjay Raut on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार आणि संजय राऊत या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता.
मुंबई: अजितदादांबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे, दादा येणार... दादा बोलणार आणि दादा जिंकणार अशी स्तुतीसुमने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उधळली. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला होता, त्यानंतर आज संजय राऊत यांनी जाहीर भाषणात अजित पवारांची स्तुती केली आहे.
महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांचं सर्वांनाच आकर्षण आहे. आज सकाळपासून चर्चा सुरू होती की वज्रमूठ सभेसाठी अजित पवार येणार का ना नाही? त्यांना मला सांगायचं आहे की दादा येणार... दादा बोलणार आणि दादा जिंकणार.
खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना आहे तोपर्यंत मुंबईचा लचका तोडता येणार नाही, म्हणून दिल्लीश्वरांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. आज आमच्यासोबत सगळे आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, दलित आणि मुस्लिम मावळे. त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार असून ती कुणालाही तोडता येणार नाही.
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्र सरकार विरोधात कुणी काही बोललं तर त्याच्यामागे ईडी लावली जाते, त्याला आत टाकलं जातं. दुसऱ्या बाजूला देशाला लुटणारे, बँकांना लुटणारे चोर भाजपमध्ये घ्यायचे आणि त्यांना शुद्ध करायचं. सुबहका भ्रष्टाचारी भाजपमध्ये शामिल होता है तो वो देशभक्त कहलाता है. आम्ही तुरुंगात जाऊन आलो, तुमच्या बापालाही घाबरत नाही.
ही वज्रमूठ नसून महाराष्ट्राचं एकी आहे, 2024 साली महाराष्ट्रात आणि देशात ही वज्रमूठ सत्तेत येणार असल्याचा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत आणि अजित पवारांचा वाद
अजित पवार महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत जाणार आणि मुख्यमंत्री होणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होत होती. त्यावर संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली होती. महाविकास आघाडीत अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये मतभेद वाढत चालले होते. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाबद्दल बोला, आमच्या पक्षाबद्दल बोलू नका असं अजित पवारांनी त्यांना सुनावलं होतं. त्याला खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं होतं. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त शरद पवारांचं ऐकतो असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करणं टाळलं होतं.