Gondia News :मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला; अवघ्या दोन महिन्यातच पुलाला पडल्या भेगा
Mumbai-Kolkata National Highway: दोन महिन्यापूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूलाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा पुलच दुभंगल्याचे चित्र आहे
Gondia News गोंदिया : दोन महिन्यापूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूलाला मोठ-मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा पुलच दुभंगल्याचे चित्र आहे. परिणामी पुलावरून एकेरी वाहतूक करण्याची नामुष्की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर आली असून कामाच्या गुणवत्तेवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर चार वर्षांपूर्वी नागपूर ते देवरीदरम्यान मौदा, मोहघाटा, नैनपूर, मासूलकसा घाट आणि शिरपूर या पाच ठिकाणी जंगल परिसरात वन्यप्राण्यांच्या आवागमनासाठी भुयारी मार्गाला मंजूरी देण्यात आली.
यानुसार जिल्ह्यातील कोहमारा ते देवरी पर्यंत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा जंगल परिसर असल्याने नैनपूर आणि मासूलकसा घाट परिसरात वन्य प्राण्यांना आवागमन करण्याकरिता उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यात नैनपुर जवळील एक पूल वाहतुकीसाठी दोन महिन्यापूर्वी सुरू करण्यात आला होता. मात्र, दोन महिन्यांतच या उड्डाणपुलावर मोठ-मोठ्या भेगा पडल्याने पुल बंद करण्याची वेळ संबंधित कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण प्रशासनावर आली आहे.
वाहतूक सुरू होताच आठवडाभरात पुलावर मोठे भगदाड
विशेष म्हणजे, सुरुवातीला पुलावरून वाहतूक सुरू होताच आठवडाभरात या पुलावर मोठे भगदाड पडले होते. त्यावेळीही या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, दुरुस्ती केल्यानंतर दोन महिन्यापूर्वी या पुलावरून पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, यावेळी पुलावर मोठ्या भेगा पडल्याने हा उड्डाणपूल दुभंगल्याचे दिसून येत आहे. तेव्हा बांधकाम कंत्राटदार कंपनी आणि संबधितांकडून पुन्हा एकदा हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. तर दोन महिन्यातच पुलावर भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
मासूलकसा घाट पुलाचीही हिच अवस्था
मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर जिल्ह्यातील नैनपूर आणि मासूलकसाघाट परिसरात उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत असून या बांधकामाचे कंत्राट अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. दरम्यान, या दोन्ही पुलाच्या बांधकामाच्या सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. नैनपूर येथील पुलावर यापूर्वी भगदाड व आता भेगा पडल्या असताना गेल्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मासूलकसा घाट परिसरातील पुलाची भिंत कोसळल्या घटना घडली होती. त्यामुळे दोन्ही कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
हे ही वाचा