'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चे सुधारित निकष, GR निघाला, 31 ऑक्टोबरपर्यंतच मुदत; असा करा अर्ज
अर्जदारांना सुधारित निकषानुसारच ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे लागणार आहे.
मुंबई : राज्यात सध्या शासकीय योजनांची चलती असून लाडकी बहीण योजनेला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार केला जात आहे. त्यातच, सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhymantri) सुरू केली असून त्यासाठीही अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास 11 जुलै 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ (Minister) बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सुरु करण्यास 14 जुलै, 2024 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. मात्र, आता शासनाने नवीन शासन निर्णय जारी करत या योजनेच्या प्रक्रियेतील सुधारीत निकष जाहीर केले आहे. त्यामुळे, अर्जदारांना सुधारित निकषानुसारच ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे लागणार आहे.
राज्य शासनाने 11 ऑगस्ट रोजी नवीन शासन निर्णय काढून या योजनेसाठी निषक जारी केले आहेत. तत्पूर्वी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी 31 जुलै,2024 व 05 ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयामधील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' या योजनेच्या 14 जुलै,2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशता सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, अर्ज करण्याची प्रक्रिया, सुधारित निकष आणि लाभार्थ्यांची निवड याची माहिती देण्यात आली आहे.
सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत :-
सुधारित निकष
(1) योजनेच्या लाभासाठी 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑफलाईन अर्ज व तद्ननंतर ऑनलाईन अर्ज,
(अ. क्र. 4) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा अंत्योदय अन्न योजना (AAY)/ प्राधान्य कुटुंब योजना (PHH)/ वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड (NPH) शिधापत्रिकाधारक नागरिक.
लाभार्थ्यांची निवड :-
1. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित पारदर्शक पध्दतीने लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील 100 टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतिक्षा यादी देखील तयार केली जाईल. मात्र 31 ऑक्टोबर, 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याकरीता कमाल 1000 (एक हजार) पात्र लाभार्थ्यांचा कोटा निश्चित करण्यात येत असून सदर कोट्याच्या कमाल मर्यादेत तसेच प्रति लाभार्थी रु. 30,000/- (रुपये तीस हजार) च्या कमाल मर्यादेत शासनाने 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या तीर्थक्षेत्रांमधून तीर्थदर्शन यात्रा (दूर पॅकेज) निश्चित करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीस असतील.
2. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर (दि. ३१ ऑक्टोबर, २०२४ नंतर) जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल.
3. जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर जिल्हास्तरीय समिती त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.
अर्ज करण्याची प्रक्रिया :-
अर्जदाराने योजनेचे अर्ज 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑफलाईन पध्दतीने व तद्नंतर योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:-
1) पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ३१ ऑक्टोबर, 2024 पूर्वी ऑफलाईन पध्दतीने आणि तद्नंतर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.
2) 31 ऑक्टोबर,2024 पूर्वी ज्यांना ऑफलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात उपलब्ध असेल.
तात्पुरत्या यादीचे प्रकाशन :-
ऑफलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीर केली जाईल. आणि ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/अॅपवर जाहीर केली जाईल.
मूळ अर्जदारासह जीवनसाथी/सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी :-
75 वर्षावरील अर्जदाराच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असले तरीही जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल.
सहायकाचे किमान वय 21 वर्षे ते कमाल 50 वर्षे असावे. एखादा सहायक प्रवासात घेतल्यास, त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यकाने शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.