(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"योग्य वेळ येताच सावत्र भावांना जोडे दाखवा", एकनाथ शिंदेंची 'लाडक्या बहिणीं'ना साद!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) आज (17 ऑगस्ट) अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला. सध्या या योजनेच्या माध्यमातून महिलांना दोन महिन्यांचे तीन हजार रुपये दिले जात आहेत. पुढच्या महिन्यात ज्या महिलांना दोन महिन्यांचे पैसे आलेले नाहीत, त्या महिलांना 4500 रुपये दिले जाणार आहेत. तशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ते पुण्यात बोलत होते. तर याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ही योजना चालूच राहील, असे सांगत विरोधकांवर सडकून टीका केली. त्यांनी सावत्र भाऊ असा उल्लेख करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. योग्य वेळ आल्यावर या सावत्र भावांना योग्य जागा दाखवा, असे आवाहनही त्यांनी महिलांना केले.
मी अनेक बहिणींच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू पाहिले
मी जिथे-जिथे जातोय तिथे-तिथे मला लाडक्या बहिणी (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पैसे आल्याचे दाखवत आहेत. आज हा लाडक्या बहिणींचा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. मी लाडक्या बहिणींचे आभार मनातो, वंदन करतो. मी अनेक बहिणींच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू पाहिले. त्यांच्या डोळ्यात सरकारप्रती आदर पाहिले. महिलांच्या आयुष्यात सुखा-समाधानाचे दिवस यावेत अशी एवढीच आमची इच्छा आहे. आम्हाला दुसरं काहीही नकोय, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मला लाखो बहिणी मिळाल्या
आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना आणल्या. रोजगार प्रशिक्षण, कृषीपंप योजना आणली. आम्ही महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. आपण सणासुदीला एकत्र येतो. आपण सगळे भावंडं आहोत. परवा रक्षाबंधन आहे. बहीण-भावाचा हा रक्षाबंधनाचा हा सण फक्त हिंदू संस्कृतीत आहे. प्रत्येकाला भाऊ-बहीण असतात. मलाही एक सख्खी बहीण आहे. पण लाडक्या बहिणीच्या रुपात मला लाखो बहिणी मिळाल्या, याचा मला आनंद आहे, अशा भावना शिंदे यांनी व्यक्त केल्या.
संधी येईल तेव्हा सावत्र भावांना जोडा दाखवा
आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलो आहोत. म्हणूनच आम्ही अनेकांना पुरून उरलोय. सावत्र, कपटी भावांवर मी मात करून इथपर्यंत आलोय. त्यामुळे सावत्र भावांवर तु्म्ही विश्वास ठेवू नका. योग्य वेळी त्यांना जागा दाखवा. सावत्र भाऊ खोटे आरोप करत आहेत. लाडकी बहीण योजना कशी फसवी आहे, हा चुनावी जुमला आहे, असे विरोधक म्हणत आहेत. माझ्या बहिणींबद्दल असं बोलताना जनाची नव्हे तर मनाची वाटायला पाहिजे. ही योजना बंद व्हावी म्हणून ते कोर्टात गेले. पण न्यायालयाने त्यांना चपराक दिली. न्यायालयाने बहिणींच्या बाजून निकाल दिला. त्यामुळे संधी येईल तेव्हा सावत्र भावांना जोडा दाखवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
...त्यांना दीड हजार रुपयांचं मोल कसं समजणार
लाडकी बहीण योजनेच्या पूर्ण वर्षाचे आपण आर्थिक नियोजन केले आहे. विरोधक दीड हजारांत काय होणार, असे म्हणत आहेत. पण तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना दीड हजार रुपयांचं मोल काय समजणार. मला आनेक बहिणींनी सांगितलं की आम्हाला एक आधार मिळाला. काही विधवा बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायला मिळाला, असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा :
लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा!