MPSC Exam : उद्या होणाऱ्या MPSC परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी, राज्य सरकारचं परिपत्रक जारी
MPSC Exam : 4 सप्टेंबर म्हणजेच, उद्या होणाऱ्या एमपीएससी (MPSC) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी एमपीएससी परीक्षेचं ओळखपत्र सोबत ठेवावं लागणार आहे.
MPSC Exam : एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा उद्या 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. परीक्षेसाठी परीक्षाकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच परीक्षास्थळी त्यांना लवकर पोहोचता यावं यासाठी त्यांना लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना लोकलमधून प्रवास करायचा असल्यास त्यासाठी त्यांना परीक्षेचं ओळखपत्र दाखवावं लागणार आहे. सरकारनं याबाबत परिपत्रक काढलं आहे.
एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा उद्या होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक विद्यार्थी या परीक्षेच्या प्रतिक्षेत होते. अशातच कोरोनाच्य प्रादुर्भावामुळं प्रवासावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मुंबई लोकमधून प्रवास करण्यासाठीही लसीचे दोन डोस घेणं अनिर्वाय आहे. ज्यांचे लसीचे दोन डोस होऊन 15 दिवस उलटून गेले आहेत, केवळ त्यांनाच मुंबई लोकलचा पास दिला जात आहे. अशातच विद्यार्थ्यांना उद्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणी होऊ नये म्हणून राज्य सरकारनं याबाबत रेल्वे विभागाला पत्र लिहलं होतं. या पत्रात विद्यार्थांना प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी सरकारने रेल्वे विभागाला केली होती. सरकारच्या या मागणीला रेल्वे विभागाने आता सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
रेल्वे विभागाच्या परवानगीनंतर आता दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 साठी विद्यार्थ्यांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. त्यासाठी एमपीएससी परीक्षेचं ओळखपत्र सोबत ठेवावं लागणार आहे. ओळखपत्र दाखवल्यानंतरच विद्यार्थांना परीक्षेसाठी लोकलमधून प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब'साठी ही परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. याबाबत परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. राज्य सरकारनं 3 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय कळवला होता.
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हीच परीक्षा 4 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.