Ashok Chavan : मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये; अशोक चव्हाणांचा प्रकाश आंबडेकरांवर पलटवार
Ashok Chavan on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर सारख्या जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून जाती जातीत फूट पाडण्याच काम करू नये, असं वक्तव्य खासदार अशोक चव्हाण यांनी केलंय.
Ashok Chavan : "कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे," असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. सोबतच या निवडणुकीत कुणबी मराठा (Maratha) उमेदवाराला मतदान करू नका, असही आवाहन त्यांनी ओबीसींना केलय. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आंबडेकरांच्या या वक्तव्यावरुन आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पलटवार करत प्रकाश आंबडेकरांवर निशाणा साधला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं वक्तव्य हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे. राज्यातील एका जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून जाती जातीत, समाजात, विशेषत: मराठा समाजात अंतर्गत फूट पाडण्याच काम करू नये, असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य हे अतिशय दुर्दैवी
मराठा समाज एकत्र असून मराठा समाजात कुठलाही वाद-विवाद राहिला नाही. मात्र अश्या प्रकारच्या वक्तव्यातून मराठा समाजातले अंतर्गत संबंध खराब करण्याचं काम होत असेल तर ते बरोबर नसल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले. राज्यातील राजकारणात आणि समाजात प्रकाश आंबेडकर सारख्या जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे, निवडणुका आज आहेत, उद्या त्या संपून जातील. पण समाजा-समाजात जी दरी निर्माण होते ती वर्षानुवर्षे तशीच राहते. त्यामुळे समजात अंतर्गत फूट पाडण्याच काम कोणी करू नये. अशी माझी विनंती त्यांना असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. आरक्षण बचाव यात्रे दरम्यान ते वाशिमच्या पोहरादेवी येथे आले असता त्यांनी हे वक्तव्य करत ओबीसींना आवाहन केलंय. विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटील की जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे, असं वक्तव्य आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे आलेले असताना प्रकाश आंबेडकर यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या