(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SSC Results 2020 | बारामतीत माय लेकराचे एकाच वेळी दहावीत यश संपादन, वर्षभर मुलगाच बनला होता आईचा शिक्षक
बारामती तालुक्यातील पारवडी गावातील गुरव कुटुंबात दहावीच्या परिक्षेचा निकालाचा आनंद व्दिगुणित आहे. मुलगा आणि आई दोघे माय लेकर ही एका वेळी उतीर्ण झाल्याची दुर्मीळ घटना बारामती तालुक्यात घडली.
बारामती : अनेक पालकांना आपला मुलगा चांगल्या मार्गाने परीक्षेत उत्तीर्ण व्हावा असे वाटत असते असे त्यांचे स्वप्न असते त्यामुळे ते पालक आपल्या मुलाचा दररोज अभ्यास घेत असतात बारामतीत मात्र मुलानेच आपल्या आईला दहावीत उत्तीर्ण व्हावे यासाठी स्वतःच्या दहावीच्या अभ्यासाबरोबर तिचाही दहावीचा अभ्यास घेत एकाच वेळी या दोघांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
बारामती तालुक्यातील पारवडी गावातील गुरव कुटुंबात दहावीच्या परिक्षेचा निकालाचा आनंद व्दिगुणित आहे. कारण कुटुंबातील मुलगा आणि आई दोघे माय लेकर ही एका वेळी उतीर्ण झाल्याची दुर्मीळ घटना बारामती तालुक्यात घडली. वयाच्या 36 व्या वर्षी आईने दोन्ही मुलांच्या मदतीने माध्यमिक शालांत परीक्षेत 64.40 टक्के गुण मिळवत पास होण्याचे आपले अपुर्ण स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या थोरल्या मुलाने देखील दहावीच्या परीक्षेत 73.20 टक्के गुण मिळवले आहे. या वर्षी मुलगा सदानंद आपल्या आईचा शिक्षक बनला. त्यामुळे त्याचा ही अभ्यास झाला. कधी आई स्वयंपाक करताना शेजारी बसून जेवताना दोन्ही मुलं आईला मार्गदर्शन करत. पुढे बारावीची परिक्षा पास होऊन पदवी मिळवण्याचा त्यांची महत्वकांक्षा आहे.
बेबी गुरव या बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये पायोनिअर कॅलिकोज कंपनीमध्ये शिवणकाम करतात. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावातील माहेरी वडिलांच्या वेडसरपणामुळे कौटुंबिक कारणामुळे त्यांची दहावी पास होण्याची महत्वकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांचा मुलगा सदानंद गुरव हा रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय शेटफळगढे ता. इंदापूर येथे दहावीत शिकत होता. तर धाकटा मुलगा आठवीत शिकत होता. त्यांनी पतीच्या आग्रहास्तव दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पती पत्रकारितेचे काम करतात. त्यांनी प्रोत्साहन देत आत्मविश्वास वाढवला. बांदलवाडी येथिल बालविकास विद्यालयातून बहिस्थ विद्यार्थी व परिक्षार्थी अर्ज भरला. दिवसभराच्या काबाडकष्टानंतर रात्री घरकामातून वेळ मिळताच अभ्यासात डोके घालत. त्यांनी दहावीतील यशाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.दोघांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
संबंधित बातम्या :
- SSC Results 2020 | बीडमधील धनंजय नखातेने मिळवले सार्याच विषयात 35 गुण!
- SSC Results 2020 | 'हे' आहेत 100 टक्के गुण मिळवणारे दहावीचे बहाद्दर
-
Maharashtra SSC Result 2020 | राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, यंदाही निकालात मुलींची बाजी