एक्स्प्लोर
बीकेसीतील प्रदूषण रोखण्यासाठी एमएमआरडीएचे आदेश
वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो कास्टिंगचे काम सुरू आहे. या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ परिसरात उडते. धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रो कास्टींगमध्ये यार्डमध्ये पाण्याचा वापर करावा, अशी सूचना मेट्रो पर्यवेक्षकांनी दिली आहे.

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आदेश दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एमएमआरडीएचे आयुक्त रा.ए. राजीव यांनी हवेचे, धुळीकणांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाण्याचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.
वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो कास्टिंगचे काम सुरू आहे. या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ परिसरात उडते. धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रो कास्टींगमध्ये यार्डमध्ये पाण्याचा वापर करावा, याबाबत मेट्रो पर्यवेक्षकाने पाहणी करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दरदिवशी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
कास्टींग यार्डमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांचे टायर स्वच्छ करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जेणेकरून बीकेसीतील मुख्य रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरणार नाही. संबंधित कंत्राटदारांनी याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंत्राटदाराला दररोज पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. वाळू, धूळ, दगडाचे तुकडे, घाण आदी पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे.
मुंबई मेट्रो-3चे भूमिगत मार्गाचे बांधकाम सध्या सुरू आहे. या बांधकामादरम्यान मोठ्या प्रमाणावर धूळ बाहेर पडते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना धूळ मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याची बाब समोर आली आहे. मेट्रो मार्ग-3 च्या बांधकामाच्या वेळेस संबंधित भागातील धूळीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आदेश देण्यात आले असून त्यात अपयशी ठरल्यास संबंधितांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
एमएमआरडीएचे मैदान भाडेतत्वावर विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी देण्यात येते. त्यावेळी तात्पुरते बांधकाम करणाऱ्या प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचा वापर करण्यासह योग्य ती काळजी घेण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे. त्याशिवाय कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रम स्थळी साचलेला कचरा हटवण्याची आणि मैदान स्वच्छ करण्याची जबाबदारी आयोजकांवर असणार आहे. तसे न केल्यास अनामत रक्कम दंड म्हणून जप्त करण्यात येईल.
धूळीचे प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनेसह बेकायदा पार्किंगही रोखण्यासाठी एमएमआरडीएने पावले उचलली आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलात बेकायदेशीर पार्किंग केल्यास वाहनचालकांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
संकुलात हॉटेलसदेखील आहेत. या हॉटेलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांची, पाहुण्यांची वाहने बीकेसीमधील रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये उभी करण्यात येतात. संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने ही वाहने पहिल्या लेनमध्ये असतील याची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या लेनमध्ये वाहन उभी केले असल्याचे आढळल्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. हाच नियम रुग्णालयासाठी लागू करण्यात आला आहे.
दररोज संध्याकाळी बीकेसीतील रस्ते धुण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. संबंधित विभागाकडून दर आठवड्याला अहवाल देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























