आमदार रणजित कांबळेंची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी, वर्ध्यामधील देवळीतील प्रकार
वर्ध्यातील देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना शिवीगाळ करत दमदाटी केली असल्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. देवळी मतदारसंघात आयोजित तपासणी शिबीरावरून ही दमदाटी झाल्याची माहिती पुढे येत आहे
वर्धा : वर्ध्यातील देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना शिवीगाळ करत दमदाटी केली असल्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. देवळी मतदारसंघात आयोजित तपासणी शिबीरावरून ही दमदाटी झाल्याची माहिती पुढे येत आहे. या ऑडीओ क्लिपमध्ये आमदार कांबळे यांनी अत्यंत अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याचं समोर आलं आहे. तसेच मारहाण करण्याची देखील धमकी दिल्याचं या क्लिपमधून समोर येत आहे.
देवळी तालुक्यात नाचणगाव येथील शाळेत अँटीजन, आरटीपीसीआर चाचणीच शिबिर घेण्यात आलं. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी छायाचित्र काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यावर आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना फोनवरून धारेवर धरलं. यावेळी कांबळे यांची जीभ घसरली आणि शिवीगाळ केल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये समोर आलं आहे. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आमदार रणजित कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दर्शवला. दरम्यान या प्रकाराचा जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेने निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांना विचारणा केली असता अशी तक्रार सध्या तरी मिळाली नसल्याचं सांगितलं.