अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयच्या कारवाई प्रकरणी मंत्री जयंत पाटील यांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर काल सीबीआयने कारवाई केली. या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सांगली : अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाई प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलाय. देशातील आणि राज्यातील कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करत अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय लावली आहे. देशातील कोविडची परिस्थिती हाताळण्यात काही लोकं ही अपयशी ठरत आहेत. देशमुख यांच्या मागे लागण्यापेक्षा हा वेळ जर कोविडला भारतातून बाहेर काढण्यासाठी दिला असता तर चांगली परिस्थिती देशात राहिली असती. देशमुख यांच्यावर दाखल केलेली FIR ही अंत्यत भोंगळ स्वरूपाची आणि मर्यादेचा भंग करून जे सांगितले नाही त्या विषयाला स्पर्श करणारी असल्याचे पाटील म्हणाले.
सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. सीबीआयचा राजकीय वापर होतोय. राज्यात मोघलाई लागलीय असे वाटावे असा हा आजच्या अनिल देशमुख यांच्या झालेल्या कारवाईच्या प्रकारावरून वाटते. अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करण्यासाठीच आधी FIR दाखल केली मग छापेमारी सत्र सुरू केले असे पाटील म्हणाले.
सीबीआयकडून कायद्याचा भंग..
100 कोटी मागणी प्रकरणी सीबीआयकडून शनिवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्रीय भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि सीबीआयच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेला सीबीआयचा छापा म्हणजे भोंगळ कारभार असून आधी एफआयआर दाखल करण्यात आला आणि मग छापा टाकण्यात आला. म्हणजे छापा टाकण्यासाठी एफआयआर दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार सीबीआयच्या मर्यादांचे उल्लंघन करणारा असून सीबीआयकडून कायद्याचा भंग करत ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
Anil Deshmukh : सीबीआयकडून छापेमारी झाल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कोरोनाच्या स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी छापा..
तसेच आज देशात आणि राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. अशात राज्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असताना केंद्र सरकारने आता देशातल्या सर्व ऑक्सिजन प्लांट आपल्या नियंत्रणाखाली घेतलेले आहेत. महाराष्ट्र सरकारला याआधी जवळून ऑक्सिजन पुरवठा होत होता. मात्र, आता त्यांनी सरकारकडून लांबून ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन राज्यात येण्यासाठी विलंब लागणार आहे, अशा परिस्थितीमध्ये केंद्राकडून देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून लक्ष बाजूला करण्यासाठी देशमुख यांच्या घरावर छापा टाकण्यात आल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
भाजपकडून राजकीय कट..
कोणत्याही विषयावर नेहमी बोलणारे भाजपचे राज्यातले नेते आता मात्र गप्प आहेत. यामुळे या सर्वांच्या मागे तेच आहेत का याबद्दल आता शंका निर्माण झाली आहे. असे विधान देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केले. 'मी पुन्हा येईन' म्हणणारे 17-18 महिने झाले अजून सत्तेवर आले नाहीत, म्हणजे 5 वर्ष येणार नाहीत याची लोकांना आता हळूहळू खात्री होऊ लागलीय. त्यामुळे विरोधकांच्या मागे असे काही तरी चौकशी लावून आम्ही पुन्हा येणार हे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चौकशीमुळे महाविकास आघाडी अडचणीत येत नाही. 170 आमदार महाविकास आघाडी बरोबर असून तिन्ही पक्ष आज एकसंध आहेत. आज या छापासत्रावर मी पुन्हा येईन असे म्हणणारे अजून काहीच बोलले नाहीत हे आश्चर्य आहे. नाहीतर काही झाले तरी चटकन बोलणारे अजून का बोलले नाहीत हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.