हायकोर्टाने अनिल देशमुख यांची चौकशी होणं महत्वाचं असल्याचं म्हटलं होतं. कोर्टानं आदेशात म्हटलं होतं की, "अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान अनिल देशमुखांच्या घरावरील छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. 

परमबीर सिंह यांचा आरोप
काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. मग अनिल देशमुख यांचीही चौकशी झाली होती.