एक्स्प्लोर
औरंगाबाद दंगलीबाबत इम्तियाज जलील यांचं चंद्रकांत खैरेंना पत्र
दंगल घडवणाऱ्या काही मूठभर लोकांमुळे शहराला बदनाम करणं योग्य नाही. शहराला शांतता हवी आहे, त्यामुळे यापुढे एकत्र येऊन प्रयत्न करु
औरंगाबाद : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे औरंगाबादमधील खासदार चंद्रकांत खैरे यांना पत्र लिहिलं आहे. "औरंगाबाद दंगलीनंतर शहरात शांतता प्रस्थापित करण्याऐवजी चंद्रकांत खैरेंनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम केलं. हे लोकप्रतिनिधींना शोभण्यासारखं नाही," असा आरोप जलील यांनी पत्रात केला आहे.
"दंगल घडवणाऱ्या काही मूठभर लोकांमुळे शहराला बदनाम करणं योग्य नाही. शहराला शांतता हवी आहे, त्यामुळे यापुढे एकत्र येऊन प्रयत्न करु," असं आवाहनही जलिल यांनी खैरेंना पत्राद्वारे केली आहे.
जलील यांचं पत्र
खासदार खैरे साहेब,
गेल्या आठवड्यात आपल्या शहरात जे काही दुर्दैवी घडलं, त्याला ना तुमचा हिंदू धर्म जबाबदार आहे, ना माझा इस्लाम. याला जबाबदार आहेत, दोन्ही धर्मातील मूठभर माणसं. या मूठभर माणसांना धर्म काय सांगतो, हे कळलेलंच नाही. दु:ख याचं वाटतं की, आपणही ते समजावून घेतलेलं नाही.
खासदार या नात्याने आपण समाजातील तणाव कमी करण्यासाठी झटायला हवं. त्याऐवजी आपण धार्मिक तणाव वाढवण्याचं काम करत आहात. शहर शांत होत असताना आपण वातावरण कलुषित करणारी भूमिका घेता. पोलिसांची परवानगी नसतानाही हिंदू शक्ती मोर्चा काढून ज्या शहराने तुम्हाला नेतृत्त्व करण्याची संधी दिली, तिथलं जनजीवन राजकीय फायद्यासाठी खराब करणं योग्य आहे का?
शहरात कचऱ्यापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी काम करायचे सोडून आपण धार्मिक संघर्ष वाढवण्याचं काम करता आहात. दंगलीत प्राण गमावलेल्या निरपराधांच्या भावना तुम्हाला जाणवत नाही का?
दंगलीत जळलेल्या एका हिंदू स्वामींचं आईस्क्रीमचं दुकान मी बांधून देतोय. गुलमंडी परिसरातील मुस्लिमाचे सिल्कचे जळलेलं दुकान तुम्ही बांधून देणार का?
लोकप्रतिनिधी म्हणून आपण तुमच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय शांती मोर्चा काढूया, तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतोय.
इम्तियाज जलील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement