Crime News : लघुशंका करण्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण, अहिल्यानगरमधील घटना, जखमींवर उपचार सुरु
Ahilyangar Crime : अहिल्यानगरमध्ये दोन जणांना 27 एप्रिलला लघूशंकेच्या कारणावरुन मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत.

अहिल्यानगर : लघुशंकेच्या कारणावरून दोन जणांना लोखंडी रॉड, दांडक्याने मारहाण झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाटेफळ येथून समोर आली आहे. याबाबत प्रशांत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात नारायण कोळेकर, बाळासाहेब कोळेकर, सोमनाथ चितळकर, सुशील चितळकर, सोन्या उल्हारे, धरम महारनवर, अजय साबळे, नारायण कोळेकर यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
प्रशांत चौधरी आणि भाऊसाहेब चौधरी हे वाटेफळ येथील सर्विस रोडवरील बसस्टँडवर दीपक कराळे याची वाट पाहत असताना लघुशंका आल्याने ते बसस्टँडचे आडोशाला लघु शंका करण्याकरिता गेले त्या ठिकाणी नारायण कोळेकरने येऊन ही काही लघुशंका करण्याची जागा आहे का? असं म्हणत वाद सुरू केला त्यानंतर बाचाबाची होऊन त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी त्यांना सोडवण्याकरता आलेले वेदांत चौधरी, दीपक कराळे यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके, दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
नेमकं काय घडलं? तक्रारीत काय म्हटलंय?
प्रशांत चौधरींनी तक्रारीत म्हटल्यानुसार हा प्रकार 27 एप्रिल म्हणजेच रविवारी घडला. प्रशांत चौधरी व त्यांचा चुलत भाऊ भाऊसाहेब बाळासाहेब चौधरी असे दोघेजण शाईन मोटार सायकलवरुन रुईछत्तीशी येथून बाजार करुन घरी जात होते. यावेळी वाटेफळ येथील सर्विस रोडवरील बस स्टॅण्डवर दिपक कराळे याची वाट पहात थांबले होते. रविवारी साडे सातच्या सुमारास प्रशांत चौधरी, भाऊसाहेब बाळासाहेब चौधरी हे बस स्टॅण्डच्या आडोशाला लघुशंका करत होते. मात्र, त्याचवेळी नारायण कोळेकर हा त्या ठिकाणी आला व म्हणाला की, येथे लघुशंका करायची जागा आहे का, इथे आमच्या बायका असतात. त्यावर प्रशांत चौधरी यानं त्यास चुकी झाली असे म्हणलं. त्यावेळी नारायण कोळेकर आणि लहान भाऊ बाळासाहेब कोळेकर हे आले आणि त्यांनी दोघांनी मिळून मला व माझ्या चुलत भावाला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी सोनाथ चितळकर यास फोन करुन बोलावून घेतले.
हातात लोखंडी रॉड, लोखंडी गज, लाकडी दांडके आणले व त्या सर्वांनी आम्हा दोघांना लोखंडी राँड, लोखंडीगज, लाकडी दांडके माराहण करुन गंभीर दुखापत केली, सदर वेळी सोमनाथ चितळकर व नारायण कोळेकर यांनी माझा चुलत भाऊ भाऊसाहेब बाळासाहेब चौधरी याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने, मारहाण करुन याला जिवंत सोडायचे नाही, असे म्हणत माझ्यासमोर सोमनाथ चितळकर व नारायण कोळेकर यांनी माझ्या भावाचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला, यावेळी भाऊसाहेब हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याने मी मोठ्याने ओरडत असताना मला देखील सोमनाथ चितळकर सोबत आलेल्या लोकांनी मला लोखंडी गजाने माझे पाठीवर, डोक्यावर, मारहाण केली व सोमनाथ चितळकर याने बेल्टने माझे डोक्यावर मारहाण केली. तसेच सदर वेळी माझे उजव्या हातातील सोन्याची अंगठी बाळासाहेब कोळेकर याने बळजबरीने काढून घेतली आहे.























