एक्स्प्लोर
कौतुकास्पद... सांगलीच्या आटपाडीत क्वारंटाईन काळात गिरवले जात आहेत सैन्य भरतीचे धडे
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावी क्वारंटाईन काळात तरुणांना सैन्य भरतीचे धडे दिले जात आहेत. एका फौजीकडून त्यांना हे शिक्षण मिळत आहे. क्वारंटाईनमध्ये अनेकजण आपला वेळ कसा घालवायचा या चिंतेत असतात. मात्र क्वारंटाईनमध्ये सांगलीतील या गावात सुरु असलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.

Military recruitment lessons
सांगली : क्वारंटाईन काळात करायचं काय असा सवाल अनेकांना सतावतो. मात्र सांगलीच्या आटपाडीत क्वारंटाईन असलेले युवक चक्क सैनिक भरतीची शिक्षण घेत आहेत. एका फौजीकडून त्यांना हे शिक्षण मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एका शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये क्वारंटाईन झालेली मुले सैन्य भरतीचे धडा गिरवत आहेत.
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एकाला कोरोनाची लागण झाली. एसटी चालक असणाऱ्या त्या व्यक्तीच्या दोन मुलांसुद्धा कोरोनाची लागण झाली. ही दोन्ही मुले व्यायामासाठी बाहेर जात असत. तसेच गावातील एका विहिरीवर पोहण्यासाठी जात होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात 22 मुले आली होती.सर्वसाधारण ही सर्व मुले 16 ते 22 वयोगटातील आहेत.
तर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बावीस मुलांना क्वारंटाईन करण्यात आले. यातील बारा जण गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईनमध्ये आहेत. तर याच क्वारंटाईन सेंटर मध्ये नाशिकहून आलेल्या विनोद गायकवाड या फौजीलाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी हे सर्व एकत्रित आले आणि क्वारंटाईनमध्ये काही तर शिकायचं ही भावना यांच्यामध्ये निर्माण झाली. यातील बरेच जण हे सैन्य भरतीसाठी इच्छुक असल्याचे समोर आले. मग फौजी असणाऱ्या विनोद गायकवाड यांनी या मुलांनी सैन्य प्रशिक्षणाची तयारी दर्शवली. मग शाळेत सैन्य भरतीचे प्रशिक्षण सुरू झाले.

गायकवाड यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून मिलिटरी आणि पोलीस भरतीसाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा आणि इतर विविध प्रकारचे धडे देणे सुरू केले आहे. कोणत्या प्रश्नाला किती गुण असतात, फिजिकली परीक्षेत कशाकशाला किती गुण असतात याची सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती याठिकाणी फौजी गायकवाड देत आहेत. शिवाय सर्वच सहभागी इच्छुकांकडून व्यायामाचा सराव करुन घेतला जातो. या क्वारंटाईन सेंटरमध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर या सर्वांनी मिळून शाळेचा परिसरही स्वच्छ करून घेतला आहे.

सध्या क्वारंटाईनमध्ये अनेकजण आपला वेळ कसा घालवायचा या चिंतेत असतात. तर काही जण खाऊन पिऊन 14 दिवसांचा कालावधी संपवून निघून जातात. मात्र शेटफळे मधील क्वारंटाईनमध्ये भरती पूर्व शिक्षणाचे धडे गिरवण्याचा सुरू असलेले उपक्रम नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.
आणखी वाचा






















