Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?
हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तरेकडील राज्यांनंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे.
Maharashtra Temperature Upate:राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे प्रचंड गारठा वाढलाय. थंडीनं हातपाय सुन्न झालेत.ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्यात. स्वेटर कानटोप्यांशिवाय घराबाहेर पडणं अशक्य झालंय. हवामान विभागानं राज्यात आज थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, नाशिकमधील ओझरमध्ये 3.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. परभणीत आजही 4.1 अंश तापमान आहे. थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून हाडं गोठवणाऱ्या थंडीनं जनजीवनावर परिणाम झालाय. राज्यातील तापमानात मोठी घट झाली असून पुढील 3-4 दिवस अनेक भागातील तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
अहमदनगर 5.5 अंश, पुण्यात किती?
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह अधिक वाढल्यानं राज्यात अनेक भागात हुडहुडी भरलीय. काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. अहमदनगरमध्ये आज 5.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली असून पुण्यात 7.6 अंश सेल्सियस तापमानची नोंद होत आहे. बारामतीत आज 7.3 अंशांची नोंद झाली. निफाडला 5.6 अंश सेल्सिअस तर नाशिकला 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जेऊरमध्ये तापमान 5 अशांवर पोहोचलं. पंढरपुरात 10 अंशांची नोंद झाली असून गेल्या दोन दिवसांपासून तापमान घसरत असल्याचं नागरिक सांगतायत.
मुंबईकरही थंडींनं कुडकुडले
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमान घटल्याचं पहायला मिळतंय. आज सांताक्रूझमध्ये 14 अंश सेल्सियसची नोंद झाली. तर कुलाब्यात 19.8 अंश सेल्सियस तापमान होतं. नागपुरात काल 7 अंशांवर तापमान होतं आज या तापमानात वाढ झाली असून 8.4 अंशांवर तापमान होतं.
दवबिंदू गोठले, पानाफुलावर बर्षाचे मोती!
मागील काही दिवसात लातूर जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. संध्याकाळी पाच नंतरच हुडहुडी भरवणारी थंडीला सुरुवात होते. रात्री दहा नंतर मात्र गारठ्यात प्रचंड वाढ होते. हा गारठा सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत असतो... त्याचा परिणाम सर्वसामान्य दैनंदिन कामकाजावर झाला आहे. सकाळी शेत शिवारात दवबिंदु साचत होते. मात्र, आता हे दवबिंदू ही थंडीमुळे गोठून बर्फ होताना दिसत आहेत.. सकाळी बाहेर फिरायला गेलेली आहे किंवा शेतात गेलेल्या लोकांना गवतावर पान आणि फुलावर दवबिंदू नाहीतर पांढरे मोती दिसत आहेत. दवबिंदू गोठवणाऱ्या थंडीचा सर्वात जास्त प्रमाण औसा तालुक्यातील बोरगाव नकुळेश्वर सारख्या भागात आढळून येत आहे.
थंडीची लाट कुठे आणि कधीपासून?
हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तरेकडील राज्यांनंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 15 व 16 म्हणजे आज थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्याची चादर, तापमान निचांकी राहण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय. बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठलाय. ठिकठिकाणी शेकोटीच्या उबेला नागरिक बसल्याचं चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलय. विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान प्रचंड घसरले आहे.
हेही वाचा: