(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News: विद्यूत तार अंगावर पडून एकाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथे मंगळवारी (12 july) सकाळी 7: 45 वाजता विद्युत अपघातामध्ये एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Pune News: पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथे मंगळवारी (12 july) सकाळी 7: 45 वाजता विद्युत अपघातामध्ये एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी महावितरणच्या पर्वती विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये उपरी लघुदाब वाहिनीची तीन फेजपैकी एक वीजतार तुटून खाली पदपथावर लोंबकळत असल्याचे आढळून आले. ही वीजतार तुटल्याक्षणीच फ्यूज गेला व तारेतील विद्युत प्रवाह देखील तात्काळ बंद झाला. मात्र वीजप्रवाह नसलेली ही तार अनधिकृत व्यक्तीने हटविण्याच्या किंवा ओढण्याच्या प्रयत्नामध्ये उर्वरित दोन फेजच्या तारांमधील वीज लोंबळकणाऱ्या तारेत प्रवाहीत झाली व त्याचा धक्का बसून दुर्दैवी प्राणांतिक अपघात झाला, अशी शक्यता आहे.
या अपघातप्रकरणी महावितरणकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाला कळविण्यात आले. संबंधित विद्युत निरीक्षकांनी अपघाताच्या ठिकाणाची पाहणी करून चौकशीला सुरवात केली आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार महावितरणकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबियास तातडीची 20 हजार रुपयांची प्राथमिक आर्थिक मदत महावितरणकडून देण्यात येत आहे.
शेतातील खड्ड्यात पडून तीन भावंडाचा मृत्यू
पुण्याच्या आंबेठाण येथे तीन बहीण भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात तिन्ही भावंड खेळण्यासाठी उतरले आणि त्यातच बुडून या तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. राकेश, रोहित आणि श्वेता किशोर दास अस मृत्यू झालेल्या मुलांची नाव असून 4 ते 8 अशी त्यांची वय होती. आज सकाळी आई आणि या तिघांचा सहा महिन्यांचा भाऊ घरात होता. तर वडील कामावर गेले. त्यावेळी ही तिघे पावसाच्या पाण्यात खेळत होते. खेळता खेळता एका शेतातील खड्ड्यात उतरले. मात्र अंदाज न आल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. त्यांनी बाहेर निघण्याचा बराच वेळ प्रयत्न केला मात्र प्रयत्न असफल झाल्याने तिघांचा पाण्यात गुदमरुन जीव गेला. या घटनेने सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर सगळीकडे ही माहिती वाऱ्यासारखी पसरली.