Corona Vaccination | महाराष्ट्र सरकार आणि टास्क फोर्सकडून लसीकरण मोहिमेसाठी मेगाप्लान, कोणती कंपनी किती लस पुरवणार?
सध्या महाराष्ट्रात दररोज तीन ते साडेतीन लाख लोकांचं लसीकरण दररोज केलं जातंय. 1 मे पासून दररोज पाच लाख लोकांच्या लसीकरणाचं लक्ष्य ठेवलं जाईल.
मुंबई : 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना सरसकट लसीकरणाची परवानगी देण्यात आलीय. मात्र, हे लसीकरण वेगानं करायचं असेल तर लसीचा पुरवठा देखील तितक्याच वेगानं व्हायला हवा. महाराष्ट्र सरकार आणि टास्क फोर्सकडून लसीकरण मोहिमेसाठी आता मेगाप्लान बनवला जातोय. लसीकरणाचं दरदिवसाचं टार्गेट काय असेल? कोणत्या कंपनीकडून लसीचा किती प्रमाणात पुरवठा व्हायला हवा याचं नियोजन पुढच्या काही दिवसांतच पूर्ण होईल.
1 मे पासून कोरोनाविरोधातल्या लढाईचा एक नवा अंक सुरु होतोय. सर्वांना सरसकट लसीकरण करावं ही मागणी गेले अनेक दिवस जोर धरत होती. मात्र आता 18 वर्षांवरील नागरिकांच्या सरसकट लसीकरणाची घोषणा तर झालीय. मात्र तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील नागरिकांची लोकसंख्या आहे साधारणत: साडेआठ कोटी आहे. यापैकी एक कोटी लोकांचं लसीकरण अत्यावश्यक आहे. यापैकी एक कोटी लोकांचं लसीकरण अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या लसीकरणात पार पडलंय. त्यामुळे महाराष्ट्रासमोर सुमारे साडसात कोटींच्या लसीकरणाचं नवं आव्हान आहे.
सध्या महाराष्ट्रात दररोज तीन ते साडेतीन लाख लोकांचं लसीकरण दररोज केलं जातंय. 1 मे पासून दररोज पाच लाख लोकांच्या लसीकरणाचं लक्ष्य ठेवलं जाईल. त्यामुळे पुढच्या 5 महिन्यांत 18 वर्षांवरील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र पुढच्या पाच महिन्यात कोरोनाविरोधातल्या लसीकरण मोहिमेचा कागदावरचा आराखडा प्रत्यक्षातही आणायचा असेल तर तेवढ्याच प्रमाणात लसीचं उत्पादन होणं गरजेचं आहे.
सध्या महाराष्ट्रात सीरम इन्स्टीट्युट, भारत बायोटेक या कंपन्यांची कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस दिली जातेय. या दोन्ही कंपन्यांकडून दर आठवड्याला 17 लाख डोस उपलब्ध होत आहेत. लसीकरण मोहिमेच्या पुढच्या टप्प्यासाठी सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक या दोन्ही लसी मिळून साधारणत: दर आठवड्याला 40 लाख लस पुरवठा होणं अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त हाफकिन इन्स्टिट्युटकडून होणारा लस पुरवठा आणि नव्यानं परवानगी मिळालेल्या स्पुटनिक लसीचा पुरवठाही दिमतीला असेलच.
भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्युट या कंपन्यांना कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या लसीचे उत्पादन वाढवण्याचे टार्गेट दिलं जातंय. तसेच हाफकिन इन्स्टिट्युटलाही वेगवान लस उत्पादनाचं लक्ष्य देण्यात आलंय.
कोणत्या लस उत्पादक कंपनीला किती डोस बवण्याचे लक्ष्य?
सध्या भारत बायोटेककडून वर्षाला अंदाजे 20 कोटीपर्यंतचे कोवॅक्सिन डोस तयार होतायेत. हीच क्षमता वर्षाला 70 कोटीपर्यंत वाढवली जाईल. आणि दर महिन्याला अंदाजे 6 कोटी कोवॅक्सिन लसीचे डोस देशभरासाठी भारत बायोटेककडून उपलब्ध होतील.
नव्यानं परवानगी मिळालेल्या महाराष्ट्राच्या हाफकिन इन्स्टिट्युटची दर वर्षाला अंदाजे 20 कोटींचे लसीचे डोस तयार करण्याची क्षमता आहे. दर महिन्याला हाफकिनकडून अंदाजे 2 कोटी लसीचे डोस मिळण्याची शक्यता आहे.
तर सध्या सीरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लस उत्पादनाची क्षमता ही दर महिन्याला 6 ते 7 कोटी लसीते डोस उत्पादन करण्याएवढी आहे. ही क्षमता देखील भारत बायोटेकप्रमाणेच 3 ते 4 पट वाढवली जाईल. स्पुटनिक लसीच्या वापरला नुकतीच परवानगी मिळाल्यानं या लसीचे नेमके किती डोस उपलब्ध होऊ शकतील याचाही अंदाज घेतला जातोय.