(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune-Mumbai Express Way : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 'या' वेळेत आज मेगाब्लॉक
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज ही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे.
Pune-Mumbai Expressway Mega Block : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) आज ही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे. काल रात्री पावणे नऊच्या सुमारास इथं मातीचा ढिगारा मार्गावर कोसळला होता. त्यानंतर आज हा ब्लॉक घेतला जात आहे.
दुपारी 2 ते 4 दरम्यान मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाणार आहे. जुन्या पुणे मुंबई महमार्गाने ही वाहतूक मार्गस्थ होईल आणि लोणावळ्याजवळ पुन्हा द्रुतगती मार्गाशी जोडली जाईल. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरूच राहील. याआधी सोमवारी आणि गुरुवारी असेच विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी आडोशी बोगद्याजवळची दरड हटविण्यात आली होती.
रात्री मातीचा ढिगारा कोसळला...
काल रात्री पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मातीचा ढिगारा कोसळला होता. कामशेत बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरच ही घटना घडली होती. पावणे नऊ वाजता घडलेल्या घटनेनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू होती. काहीवेळात मातीचा हा ढिगारा बाजूला केल्यावर उर्वरित दोन लेनही सुरू केल्या. रविवारी रात्री साडे दहा वाजता दरडीची पहिली घटना घडली, ती मुंबई मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ तर दुसरी दरड त्याच मध्यरात्री तीन वाजता लोणावळ्याजवळ कोसळली होती. चार दिवसानंतर ही तिसरी घटना घडलेली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, वाहतूकही सुरळीत करण्यात आली. मात्र आता या रस्त्यावरील काही भागात दरड हटवण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जात आहे.
खर्चावर खर्च मात्र दुर्घटना कायम
पुणे-मुंबई द्रुतगतीवर दरड कोसळू नये, म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या दोन वर्षात यासाठी तब्बल 65 कोटींचा खर्च झाला आहे, 2015पासून हा आकडा शंभर कोटींच्या आसपास झाला आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मार्गावर दरड कोसळू नयेत, म्हणून डोंगरांच्या कातळकडांना जाळ्यांचं संरक्षण देण्यात आलं आहे. पण या जाळ्या निकृष्ट दर्जाच्या होत्या, असं रविवारी (23 जुलै) रात्री सिद्ध झालं. आता त्याच ठिकाणी पुन्हा नव्यानं जाळ्या लावल्या जातायेत. या जाळ्या निकृष्ट दर्जाच्या नसाव्यात, अशी अपेक्षा प्रवासी करत आहेत. पुन्हा या निकृष्ट कामाचा फटका सामान्यांना बसू नये, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :