एक्स्प्लोर
नगराध्यक्ष आणि सरपंचानंतर आता महापौरही थेट जनतेतून निवडणार : मुख्यमंत्री
राज्यातील काही शहरं अतिशय मोठी आहेत. तिथे महापौरांची थेट निवडणूक घेणं शक्य नाही. मात्र, क आणि ड वर्ग महापालिकातील महापौरांची निवड जनतेने करण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली
औरंगाबाद : नगराध्यक्ष आणि सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महापौराचीही थेट जनतेतून निवड होणार आहे. सरकार याबाबत विचार करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादमध्ये बोलताना सांगितलं.
देशभरातील महापौरांची परिषद औरंगाबादमध्ये पार पडली. त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यावेळी काही महापौरांनीच थेट निवडणुकीची मागणी केली होती. राज्यातील काही शहरं अतिशय मोठी आहेत. तिथे महापौरांची थेट निवडणूक घेणं शक्य नाही. मात्र, क आणि ड वर्ग महापालिकातील महापौरांची निवड जनतेने करण्याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात एकूण 25 महापालिका असून त्यापैकी 21 महापालिका क आणि ड वर्गातील आहेत. मुंबई महापालिका अ+ तर नागपूर आणि पुणे महापालिका अ वर्गात आहेत. ठाणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिक या ब वर्ग महापालिका आहेत.
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या साडे सात हजार ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. त्याआधी नगराध्यक्षाची निवडणूकही थेट जनतेतून करण्यात आली होती. त्यामुळे क आणि ड वर्ग महापालिकांचे महापौरही अप्रत्यक्षपणे न निवडता, त्यांचीही जनतेतून निवड व्हावी, या दृष्टीने राज्य सरकार विचार करत आहे.
राज्यातील क आणि ड वर्गातील महापालिका
- नवी मुंबई
- कल्याण-डोंबिवली
- वसई-विरार
- मीरा-भार्इंदर
- उल्हासनगर
- भिवंडी-निजामपूर
- सोलापूर
- कोल्हापूर
- सांगली-मिरज-कूपवाड
- अमरावती
- अहमदनगर
- अकोला
- जळगाव
- नांदेड-वाघाळा
- धुळे
- मालेगाव
- औरंगाबाद
- लातूर
- चंद्रपूर
- परभणी
- पनवेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement