एक्स्प्लोर
सिंहगड शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदावरुन मारुती नवलेंची हकालपट्टी
मारुती नवले हे सात दिवस तुरुंगवास भोगून आल्याने त्यांचं विश्वस्तपपद रद्द करण्यात आल्याचं धर्मादाय आयुक्त कार्यालयाने म्हटलं आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे पैसे परस्पर खात्यांमधून काढल्याने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नवलेंना अटक झाली होती

पुणे : सिंहगड शिक्षण संस्थेचे प्रमुख मारुती नवले यांची संस्थेच्या विश्वस्तपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी ही कारवाई केली. शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे पैसे परस्पर खात्यांमधून काढल्याने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नवलेंना अटक झाली होती.
मारुती नवले हे सात दिवस तुरुंगवास भोगून आल्याने त्यांचं विश्वस्तपपद रद्द करण्यात आल्याचं धर्मादाय आयुक्त कार्यालयाने म्हटलं आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर मारुती नवले सात दिवस येरवडा कारागृहात होते.
एखादा विश्वस्त तुरुंगात गेल्यास त्याचं विश्वस्तपद रद्द करण्याचे अधिकार धर्मादाय कार्यालयाला आहेत. त्या अधिकारांमधे ही कारवाई करण्यात आली आहे.
मारुती नवले यांना पदावरुन हटवल्यानंतर संस्थेच्या विश्वस्त मंडळापैकी एकाची निवड अध्यक्ष म्हणून करण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाला आहे. त्यामुळे हकालपट्टीच्या निर्णयाचा संस्थेवर कोणता परिणाम होणार नाही, असं धर्मादाय सह आयुक्तांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, नवले यांच्याविरोधात सुरु असलेली चौकशी सुरुच राहील. या निर्णयाच्या विरोधात मारुती नवले मुंबई उच्च न्यायालयात जाऊ शकतात. धर्मादाय आयुक्तांनी त्यांना चार फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली असून तोपर्यंत नवलेंना पदावरुन हटवण्याच्या आदेशाला धर्मादाय सह आयुक्तांनी स्वतःच स्थगिती दिली आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्याने सिंहगड शिक्षण संस्था गेल्या काही महिन्यांपासून अडचणीत आहे. त्यातच नवलेंनी त्यांच्या मुलांचं लग्न राजस्थानमधील उमेद भवनमध्ये शाही पद्धतीने केल्याने नवले पुन्हा चर्चेत आले होते. मात्र आता संस्थेवरुनच हटवले गेल्याने नवलेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























