![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tractor March : सरकारसह पोलिसांना 'ट्रॅक्टर'ची भीती?; पोलिसांकडून मराठा आंदोलकांना नोटीसा
Tractor March : नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर मालकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात येत आहे. ट्रॅक्टर मालकांना आंदोलनात ट्रॅक्टर देऊ नका किंवा स्वतः घेऊन जाऊ नका असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
![Tractor March : सरकारसह पोलिसांना 'ट्रॅक्टर'ची भीती?; पोलिसांकडून मराठा आंदोलकांना नोटीसा Maratha reservation Andolan tractor march in Mumbai Notice to Maratha protesters from police marathi news Tractor March : सरकारसह पोलिसांना 'ट्रॅक्टर'ची भीती?; पोलिसांकडून मराठा आंदोलकांना नोटीसा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/21/ba54f8d7270e0ecd373d9ce070939f161703155576154737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
धाराशिव : मराठा आंदोलन 24 डिसेंबरनंतर तीव्र होईल याची शक्यता लक्षात घेऊन आता पोलिसांकडून (Police) नोटीस (Notice) देण्यास सुरुवात झाली आहे. या आंदोलनामध्ये ट्रॅक्टर (Tractor) सारख्या वाहनांचा वापर केला जाऊ नये अशी सरकारची आणि पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळे पोलिसांकडून ट्रॅक्टर मालकांना नोटीसा देण्यात येत आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील ट्रॅक्टर मालकांना अशाच प्रकारे पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. नांदेडच्या कंधार पोलिसांकडून या नोटिसा देण्यात आल्या आहे. सोबतच, धाराशिव पोलिसांकडून देखील आंदोलकांनी ट्रॅक्टरचा वापर मोर्चात करू नयेत अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला असतांना सरकारकडून दोन वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एकीकडे सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करत आहे. तसेच, 24 डिसेंबरच्या मुदतीवर त्यांनी ठाम राहू नयेत अशी विनंती केली जात आहे. दुसरीकडे मराठा आंदोलक मुंबईत जाऊन आंदोलन करणार नाही याची दक्षता सरकारकडून घेतली जात आहे. सोबतच मराठा आंदोलक ट्रॅक्टर घेऊन मुंबईत धडकणार असल्याची चर्चा सुरू असताना, पोलिसांकडून ट्रॅक्टर मालकांना नोटीस देण्यात येत आहे. त्यामुळे 24 डिसेंबरनंतर होणाऱ्या आंदोलनाची गंभीर दखल सरकारकडून घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नेमकं नोटीसांमध्ये काय?
नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलिसांनी नेहरूनगर येथील शंकर पवार यांना नोटीस पाठवली आहे. ज्यात पोलिसांनी म्हटलं आहे की, "या नोटीसीद्वारे आपल्याला सुचित करण्यात येते की, सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मेळावे, आंदोलन, धरणे आंदोलन, मोर्च्याचे अयोजन करण्यात येत आहे. गोपनीय माहितीनुसार, मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 24 डिसेंबर रोजी कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आंदोलनात तुम्ही तुमचं ट्रॅक्टर घेऊन येऊ नयेत. तुमच्याकडे असलेलं ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेती कामासाठीच करावा. आपल्याकडे कोणतेही मराठा समाजाचे नेते, कार्यकर्ते ट्रॅक्टरच्या मागणीसाठी आल्यास त्यांना आपण आपले ट्रॅक्टर देऊ नये. तसे केल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येईल," असा इशारा पोलिसांनी नोटीसमधून दिला आहे.
सरकारकडून मराठा आंदोलकांना थोपविण्याचा प्रयत्न
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दिलेली मुदत संपण्यासाठी तीन दिवस बाकी आहेत. सरकार आणि जरांगे यांची चर्चा अजून निष्कर्षापर्यंत आलेली नाही. त्यामुळे 24 तारखेनंतर आंदोलन कुठल्या मार्गाला जाईल याची शाश्वती नाही. एकीकडे पोलिस मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना वारंवार बोलावून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका अशा सूचना देत आहेत. दुसरीकडे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने मराठा आंदोलकांना थोपविण्याचा प्रयत्न सुरू केलेत. या आंदोलनात ट्रॅक्टरसारख्या वाहनाचा वापर केला जाऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच काही ट्रॅक्टर मालकांना आंदोलनात ट्रॅक्टर देऊ नका किंवा स्वतः घेऊन जाऊ नका अशा आशयाच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बतम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)