Urban Naxal: दिवंगत कलाकार वीरा साथीदार यांनी माओवाद्यांकडून मुखपत्रात आदरांजली; 'या' दाव्याने चर्चांना उधाण
Urban Naxal: दिवंगत कलाकार वीरा साथीदार यांना माओवाद्यांनी मुखपत्रात आदरांजली वाहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Urban Naxal: शहरी नक्षलवाद्यांबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे नक्षलवाद्यांच्या सांस्कृतिक मंचाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या 'झंकार' या त्रैमासिकातील एका लेखामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'झंकार' मासिकात पोलिसांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या नर्मदा अक्का आणि इतर अनेक जहाल नक्षलींना लेखांच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहून जोहार (क्रांतिकारी) अभिवादन करण्यात आले आहे. मात्र, यातील एक लेख दिवंगत कलाकार वीरा साथीदार यांच्याबाबतही आहे. नक्षलवाद्यांच्या या मुखपत्राने शहरी नक्षलवाद्यांचा चेहरास समोर आला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले.
वीरा साथीदार हे आंबडेकरी-डाव्या चळवळीत सक्रिय होते. शाहीरी कलापथकांच्या माध्यमातून ते सक्रिय होते. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'कोर्ट' या चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. वीरा साथीदार हे विदर्भातील आंबेडकरी-डाव्या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या चळवळीत परिचित होते. मात्र, नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य चेतना नाट्य मंचच्या साहित्य-सांस्कृतिक मुखपत्रात त्यांची वेगळी ओळख सांगण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. नक्षलवाद्यांच्या सांस्कृतिक कलामंचाच्या मुखपत्रातील लेखात वीरा साथीदार यांना नक्षलवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य आणि जहाल नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे यांचा राजकीय मित्र असल्याचे सांगण्यात आले. नक्षल चळवळीतील सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन क्रांतीचे बिगुल फुंकले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे. वीरा साथीदार यांना त्यांच्या कार्याबद्दल क्रांतिकारी संघर्षातील सर्व सहकारी कॉम्रेड्सने मिळून क्रांतिकारी जोहार केले पाहिजे असे आवाहन ही या लेखात करण्यात आले आहे. वीरा साथीदार यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानाबाबतही या लेखात माहिती देण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे वीरा साथीदार यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांकडून तीव्र प्रतिक्रिया
'झंकार' मासिकातील या लेखानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षल विरोधी अभियानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. झंकार मासिकातील या लेखामुळे शहरी नक्षलवादाचा खरा चेहरा समोर असल्याचे पोलिसांनी म्हटले. आम्ही आधीपासूनच शहरी नक्षलवादाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचे प्रयत्न करत असून वीरा साथीदार त्यापैकीच एक असे मत नक्षलविरोधी अभियानाचे उपमहानिरीक्षक ( DIG) संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.
नक्षलवाद्यांचे दोन शाखा काम करत असून एक शाखा "पीएलजीए" (PLGA) म्हणजेच जंगलात बंदुकीचे माध्यमातून पोलीस आणि सुरक्षा दलाच्या विरोधात कारवाया करणारे आहेत. तर, दुसरी शाखा म्हणजे 'युनायटेड फ्रंट' आहे. जे शहरी भागात राहून नक्षल चळवळीकडे नव्या तरुणांना आकर्षित करण्याचे तसेच शहरी भागातील वेगवेगळ्या घटकांमध्ये लोकशाही आणि राज्यघटनेविरोधात विष पेरण्याचे काम करतता. नक्षलवाद्यांच्या मासिकात असे लेख छापून आल्यामुळे शहरी नक्षलवादाचा बुरखा त्यांनी स्वतःच फाडला असल्याचे मत उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.