मनोज जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा; 7 दिवसांत सात जिल्हे, सोलापुरातून सुरुवात, पुण्यातही येणार
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापूरपासून सुरुवात होत आहे.
सोलापूर : मराठा समजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जुलै रोजी सुरू केलेले आपले उपोषण स्थगित केलं आहे. त्यानंतर, आगामी रणनीती आखण्यासाठी ते सज्ज झाले असून आता जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून 7 ऑगस्टपासून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून (Solapur) सुरुवात होणार आहे. 7 दिवसांत सात जिल्ह्यांचा ते दौर करणार आहेत. या दौऱ्यासाठी सकल मराठा समाजाकडून (Maratha) तयारी सुरू असून विरोध न करण्याचा इशाराही सकल मराठा समाजाच्यावतीने सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आला आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापूरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यादरम्यान, मनोज जरांगे यांच्यावर टीका अथवा विरोध न करण्याचा इशारा धनाजी साखळकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर येथे ते पोहोचणार असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही शांतता रॅली निघणार असल्याचे साखळकर-माने यांनी सांगितले. मराठा समाजाची ही शांतता रॅली न राहता समाजाची त्सुनामी असेल असे सांगताना कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका टिप्पणी करू, नये असा इशाराही माने यांनी दिला.
आम्ही कोणत्याही पक्षाचे नसून कोणाच्या विरोधातही नाही, मात्र जरांगे यांच्या भूमिकेला कोणत्यातरी राजकीय पक्षाचे वळण द्यायचे आणि त्यांना बदनाम करण्याचे जे कट कारस्थान सुरु आहे, ते होता कामा नये असे माने यांनी म्हटले. या कारस्थानात अगदी मराठा समाजाचा नेता जरी आढळला तरी त्याची अवस्था खंडोजी खोपडे किंवा सूर्याजी पिसाळच्या भूमिकेत त्यास ढकलू, असाही इशारा धनाजी माने यांनी दिला आहे.
असा असेल जरांगेंचा दौरा
मनोज जरांगे पाटील हे सात ऑगस्ट रोजी सोलापूर येथे शांतता रॅली काढणार असून मुक्काम सोलापुरात असणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी सांगली, 9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, 10 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हा, 11 ऑगस्ट रोजी पुणे, 12 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर आणि 13 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात या शांतता यात्रेचा समारोप होणार आहे. सांगावा आलाय पाटलांचा , पुढील मोहिमेचा... अशा पद्धतीने सोशल मीडियावर हा मेसेज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फिरू लागला असून जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. लोकसभेत जरांगे पाटील यांच्या निरोपाने महायुतीमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला होता. आता विधानसभेपूर्वी जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याने महायुतीमधील आमदारांचे टेन्शन वाढणार असे चित्र दिसून येते.