Manoj Jarange Patil : गोरगरीब मराठ्यांनी आंदोलन उभं केलंय, आम्ही पहिल्यापासून ओबीसी आरक्षणात, त्यामुळे मिळवणारच; मनोज जरांगे पाटलांचा एल्गार
मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईत बोलताना छगन भुजबळांच्या आरोपांची चिरफाड केली. छगन भुजबळ नावाला आमचा विरोध नाही, त्या प्रवृत्तीला विरोध असल्याचा घणाघात त्यांनी केला.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला 22 ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईत बोलताना छगन भुजबळांच्या आरोपांची चिरफाड केली. छगन भुजबळ नावाला आमचा विरोध नाही, त्या प्रवृत्तीला विरोध असल्याचा घणाघात त्यांनी केला. मी माझ्या बापाचं खातोय, आम्ही 1923 पासून म्हणजेच पहिल्यापासून ओबीसी आरक्षणात, आम्ही ते घेणार असा निर्धार त्यांनी बोलवून दाखवला. गोरगरीब ओबीसींना मराठ्यांना आरक्षण हवं, अशी भूमिका असल्याचे ते म्हणाले.
आंदोलन मोडण्याची चूक आता तरी करु नका
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सरकारला आंदोलन मोडून आता चूक करू नका, असा इशाराही दिला. ते म्हणाले की, माय बाप मराठ्यांचे रक्त पिवू शकत नाही, आंदोलन मोडण्याची चूक आता तरी करु नका. कोणीच सापडेना म्हणून आमच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोप सुरु आहेत. शरद पवारांचा हात असल्याचा भाजपचा आरोप होत आहे, पण काहीच सापडेना म्हणून उद्योग सुरु आहे. मराठे स्वत:ची भाकरी घेऊन येतात, दोन रुपये देऊन येतात. तुम्ही आरोप सिद्ध करून दाखवा, दोन पाऊल मागे येतो, असे आव्हान त्यांनी दिले.
छगन भुजबळ भरकलेत
मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांच्या सात कोटींच्या आरोपांची चिरफाड केली. ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळ भरकलेत. ओबीसीतून आरक्षण नसल्याचे सांगत आतून कडी लावून घेत आहेत. सात कोटींच्या आरोपांवर ते म्हणाले, की ज्याठिकाणी सभा झाली ती पाहून त्यांना सात कोटी, दहा कोटी आठवत असेल. आम्ही जमीन विकत घेतली वाटली असेल. मग हिशेब लावला असेल.
22 गावात 21 लाख जमा झाले
त्यांनी सांगितले की, 123 गावं गोदापट्यात आहेत. या 123 गावांनी मराठ्यांची सेवा करायचं ठरवलं आहे. सभेसाठी काही लोकांनी शेत दिलं, 22 गावात 21 लाख जमा झाले. आमच्या जातीसाठी कष्टाचे पैसे दिले. आम्ही माय बाप मराठ्यांचे रक्त पिवू शकत नाही, समाजाला डाग लागता कामा नये. आम्ही कोणाकडे पैसे मागितले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
40 दिवसांनी दाखलेच हातात येणार
मनोज जरांगे यांनी 40 दिवसांनी थेट दाखलचे हातात येणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. सभेसाठी सत्ताधाऱ्यांकडून लाईट बंद करणे, इंटरनेट बंद करणे करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. तरीही मराठ्यांनी अन्याय सहन केला. कोणीही तक्रार केली नाही. आमच्यात फूट पाडण्याचं सगळ्यांचं स्वप्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या