(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : मनोज जरांगे आज परभणी, लातूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर; परभणीत तीन, तर लातुरात एक सभा
Manoj Jarange : मनोज जरांगे आज परभणी, लातूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. आज एकाच दिवशी मनोज जरांगेंच्या परभणीत तीन सभा होणार आहेत.
Manoj Jarange : मराठा आंदोलक (Maratha Protestors) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या पाचव्या टप्प्यातील गाठीभेटी दौरा सुरू झाला आहे. मनोज जरांगे आज परभणी (Parbhani) आणि लातूर (Latur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज एकाच दिवशी मनोज जरांगेंच्या परभणीत तीन सभा होणार आहेत. पहिली सभा सकाळी 10 वाजता सेलू इथे दुसरी सभा दुपारी 12 वाजता सोनपेठ तर तिसरी सभा गंगाखेडमध्ये दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तर रात्री 7 वाजता लातूरमधील रेणापूर इथे मनोज जरांगेची सभा असेल.
सर्व सोयऱ्यांना आरक्षण द्या : मनोज जरांगे
सरसकट या शब्दाभोवती फिरणारी मराठा आरक्षणाची चर्चा आता सगेसोयरे शंब्दावर येऊन पोहोचली आहे. आधी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असं म्हणणाऱ्या जरांगेंनी आता नवी मागणी केली आहे. ती म्हणजे, सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या, पण जरांगेंची ही मागणी कायद्याच्या कचाट्यात बसणारी आहे का? या मागणीमुळे आरक्षणाचा तिढा अधिक वाढवणार का? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम
मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत असून, त्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मराठवाड्यातील पोलीस प्रशासन कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), बीड (Beed) पोलिसांकडून मराठा आंदोलन आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठकांचा सत्र सुरू आहे. सोबतच आज धाराशिवमध्ये (Dharashiv) मराठा आंदोलकांशी (Maratha Protestors) प्रशासनाची बैठक होणार आहे. त्यामुळे एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मनोज जरांगी यांची भेट घेऊन 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत देण्याची विनंती केली होती. त्यामुळे जरांगे यांच्याकडून सरकारला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र, या मुदतीला आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर बीडच्या 23 डिसेंबरच्या सभेतून पुढच्या आंदोलनाची घोषणा केली जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, आपल्या 24 डिसेंबरच्या अल्टीमेटमवर मनोज जरांगे ठाम आहे. त्यामुळे 23 डिसेंबरच्या सभेत मनोज जरांगे कोणती घोषणा करणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.