पुन्हा बघतो! मराठेही बरच काम हातात घेतील; मनोज जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
Manoj Jarange : यापूर्वी एकदा असेच बोलून अजित पवारांनी मराठा समाजाचे नुकसान केलं आहे. त्यामुळे आम्हाला देखील नाइलाजाने पाऊलं उचलावी लागेल.
Manoj Jarange On Ajit Pawar : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली आहे."आमरण उपोषण करायचं असेल तर त्यावर कारवाई होते का?, यापूर्वी देखील अजित पवारांवर मी बोललो आहे. यापुढे पुन्हा अजित पवार बोलले, तर त्यांना पुन्हा बघतो. मराठा समाजाशी मी प्रामाणिक आहे. मराठा समाजातील पोरांचं नुकसान होऊ नयेत असे मला वाटतं. त्यामुळे असे बोलून पुन्हा एकदा मराठ्यांच्या मुलांचं नुकसान करायची अजित पवारांची इच्छा आहे का?, यापूर्वी एकदा असेच बोलून त्यांनी नुकसान केलं आहे. त्यामुळे आम्हाला देखील नाइलाजाने पाऊलं उचलावी लागेल. अजित पवारांच्या हातानेच पुन्हा एकदा मराठ्यांच्या पोरांचं नुकसान होत असल्याचं समाजाच्या लक्षात आल्यावर मराठे बरच काम हातात घेतील आणि मी ते वेळेवर सांगेल," असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आम्हाला सगळं काही समजलं आहे. मलाच काय तर सर्व समाजाला देखील कळलं आहे. पुन्हा एकदा मराठ्यांच्या मुलांचे हाल करायचे. पुन्हा एकदा मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान करायचं. यापूर्वी एकदा मराठा समाजाच्या मुलांचे नुकसान केलं आता पुन्हा करायचं असा याचा अर्थ दिसत आहे. अजित पवारांबद्दल सध्या मी जास्त बोलत नाही. मात्र, आता पुन्हा एकदा जर कारवाई झाली, तर ती कारवाई अजित पवारांनीच करायला लावली असा त्याचा अर्थ होईल. कुणाच्या ट्रॅक्टरवर कारवाई झाली, कुठे लोकांना अडवलं तर ती कारवाई अजित पवारांनीच करायला लावली असे मराठे ग्राह्य धरतील, असे जरांगे म्हणाले.
आमच्यासाठी आमची मागणी महत्त्वाची
राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली तरीही आम्ही मुंबईवर जाण्यावर ठाम आहोत. आमचं दुसरं कोणतंही नियोजन नाही, आमचं एकच नियोजन आहे. सरकार कुणाचंही असो आम्हाला त्याबद्दल फरक पडत नाही. आमच्यासाठी आमची मागणी महत्त्वाची असून, ती आम्ही लावून धरली आहे. आम्हाला सत्तेत कोण बसलय यापेक्षा आमच्या मुलांना न्याय हवंय हे महत्त्वाचं असल्याचं जरांगे म्हणाले.
आंदोलनाच्या नावावर पैसे जमा करू नका.
यापूर्वी जे काही कार्यक्रम झाले आहेत, ते सर्व लोकवर्गणीतून करण्यात आले. आम्ही कुणाकडूनही पैसे घेतलेले नाही. त्यामुळे मुंबईच्या आंदोलनाला जाण्यासाठी कोणी पैशांची मागणी करत असेल, कुणीही पैसे देऊ नयेत. तसेच कोणी पैसे दिले असेल तर ते परत घ्यावे. नंतर मला सांगू नका आम्ही पैसे दिले होते. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, कोणीही आंदोलनाच्या नावावर पैसे जमा करू नका. मुंबईला जाणे येण्याचा खर्च गाव पातळीवर मराठा समाज करणार आहे. त्यामुळे विनाकारण कोणीही आंदोलनाच्या नावावर पैसे गोळा करू नयेत असा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! शिंदे समिती पुन्हा मराठवाड्याचा दौरा करणार; कुणबी नोंदी शोधणार