''जरांगे 4 वेळा येऊन तुम्ही भेटला नाहीत, पण हाकेंना स्वत:हून भेटायला गेला''; मराठा आंदोलकांनी अडवलं
आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे हे आज पूर्णा तालुका दौऱ्यावर होते. दरम्यान, ते पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे गेले असता मराठा तरुणांनी त्यांना अडवत मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारला आहे.
![''जरांगे 4 वेळा येऊन तुम्ही भेटला नाहीत, पण हाकेंना स्वत:हून भेटायला गेला''; मराठा आंदोलकांनी अडवलं Manoj Jarange came 4 times but you did not meet you and meeting with laxman Hake says maratha protester to MLA ratnakar gutte ''जरांगे 4 वेळा येऊन तुम्ही भेटला नाहीत, पण हाकेंना स्वत:हून भेटायला गेला''; मराठा आंदोलकांनी अडवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/09/04e22aced35acd7a68db925324eabfa317231972526571002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आंदोलकांकडून मराठा (Maratha) नेत्यांना, मंत्र्यांना आणि सर्वच राजकीय पक्षांना जाब विचारला जात आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha election) उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांची चांगलीच गोची झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच, मराठा आंदोलकांनी आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांना अडवून आरक्षणाबाबत जाब विचारला. तसेच, तुम्ही मनोज जरांगेंना (Manoj Jarnage) अद्याप का भेटला नाहीत, याउलट लक्ष्मण हाकेंची स्वत:हून भेट घेऊन पांठिंबा जाहीर केल्याचंही मराठा आंदोलकांनी म्हटलं.
आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे हे आज पूर्णा तालुका दौऱ्यावर होते. दरम्यान, ते पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे गेले असता मराठा तरुणांनी त्यांना अडवत मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारला आहे. राज्यामध्ये सध्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे, त्याचबरोबर मिळालेल्या एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे. मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन दोन महिन्याची वाट पाहावी लागत आहे, याची माहिती देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. तसेच, या मराठा आंदोलकांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांना जाबही विचारला.
आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणूनच आपण आमदार झाला आहात. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत, पण आपण त्यांना कधीही जाहीर पाठिंबा दिला नाही. मनोज जरांगे पाटील चार वेळेस गंगाखेड विधानसभा मतदारसंघात येऊन गेले पण आपण त्यांची साधी भेटही घेतली नाही. याउलट ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी तुम्ही वडीगोद्री येथे जाऊन त्यांना पाठिंबा दिला. मागच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला मतदान केले नाही का?, असा थेट सवाल मराठा आंदोलकांनी आमदार गुट्टे यांना विचारला आहे.
नांदेडमध्येही आंदोलकांनी खासदारास अडवलं
नांदेडचे काँगेसचे खासदार वसंत चव्हाण यांना देखील एका कार्यक्रमादरम्यान मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला. काँग्रेसकडून आज सत्य गणपती येथे जनसंवाद यात्रे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार वसंत चव्हाण भाषण करण्यासाठी उभे राहिले, तेव्हा चार ते पाच मराठा आंदोलन अचानक समोर आले. या आंदोलकानी खासदार वसंत चव्हाण त्यांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला. आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का, मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं, संसदेत मागणी केली का, सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी पाठिंबा मागितला तर देणार का, असे अनेक प्रश्न वसंत चव्हाण यांना विचारले. त्यावर, मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे, मनोज जरांगे पाटलांमुळेच मी निवडून आलो. यापुढेही मराठा आरक्षणासाठी आमचा पाठिंबा कायम राहील, असं खासदार म्हणाले, त्यानंतर मराठा आंदोलक शांत झाले.
हेही वाचा
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची स्टँप पेपरवर निष्ठा; शरद पवारांकडे विधानसभेसाठी मागितली उमेदवारी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)