(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हातात तलवार, कुऱ्हाड, लाकडी दांडके घेऊन फोटोसेशन; माळशिरसच्या सात तरुणांना तुरुंगाची हवा
हातात तलवार, कुऱ्हाड तसंच लाकडी दांडके घेऊन फोटोसेशन करणं माळशिरसच्या सात तरुणांना महागात पडलं आहे. फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला
पंढरपूर : आजच्या तरुणाईला भाईगिरी करण्यात मोठेपणा वाटत असल्याचे सध्या अनेक घटनांतून समोर येत आहे. परंतु सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी येथील सात तरुणांना मात्र हातात हत्यारे घेऊन फोटो काढणे अंगलट आले आहे. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
माळशिरसच्या पिसेवाडीतील शहाजी इंगळे, दीपक भाकरे, शैलेश भाकरे, महेश भाकरे, सागर चव्हाण, सतीश इंगळे आणि समाधान भाकरे या सात तरुणांनी हातात तलवार, कुऱ्हाड आणि लाकडी दांडके घेऊन फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर अपलोड केले होते.
हे फोटो व्हायरल होताच अकलूज पोलिसांनी ताबडतोब या सात जणांचा शोध घेत कारवाई केली. या तरुणांचा इरादा काय होता? हातात हत्यारं घेऊन काय करायचं होतं? असे प्रश्न उपस्थित झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर आर्म्स अॅक्ट आणि मुंबई पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान प्रसिद्धीसाठी अनेक जण सोशल मीडियावर काही ना काही करत असतात. त्यामध्ये एखादी वादग्रस्त पोस्ट असो वा असे फोटो काढणे अशा गोष्टींचा समावेश असतो. परंतु दहशत माजवण्यासाठीही काही जण शस्त्रांसोबतचे फोटोही पोस्ट करतात. परंतु ही विकृत क्रेज पिसेवाडीसारख्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचणे ही चिंताजनक बाब आहे.