(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Maharashtra Majha Vision : आजवर महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का झाला नाही? नितीन गडकरी म्हणाले...
Majha Maharashtra Majha Vision 2021 : आजवर महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का झाला नाही, या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपलं मत व्यक्त केलं.
Majha Maharashtra Majha Vision 2021 : महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो, असं नितीन गडकरी यांनी बोलताना स्पष्ट केलं. एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल, असंही ते म्हणाले.
आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहोत. पण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राचा एखादा नेता, देशाचा पंतप्रधान झाला? असा प्रश्न एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी विचारल्यावर नतीन गडकरी म्हणाले की, "महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतंही असो. त्यामुळे मराठी माणूसच झाला पाहिजे, किंवा महाराष्ट्रातीलच झाला पाहिजे, असं काही मला मान्य नाही. उद्या जर, एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल."
आज एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडलं. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यातील पाणी प्रश्न, शेतकरी आत्महत्या, आयात-निर्यात, तसेच राज्यातील रस्त्यांबाबातही त्यांनी भाष्य केलं. याच कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मोठी घोषणाही केली. सूरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरहून सोलापूर असा नवा महामार्ग तयार केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळं पुणे-मुंबईचं 50 टक्के ट्रॅफिक कमी होणार असल्याचंही ते म्हणाले.
पुणे-मुंबईचं 50 टक्के ट्रॅफिक कमी होणार : नितीन गडकरी
एबीपी माझाचा कार्यक्रम माझा महाराष्ट्र, माझा व्हिजनमध्ये बोलताना नितीन गडकरींनी मोठी घोषणाही केली. "सूरतपासून नाशिक, नाशिकहून अहमदनगर आणि अहमदनगरहून सोलापूर असा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबईचं 50 टक्के ट्रॅफिक कमी होणार आहे. तसेच मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेमुळेदेखील आपण आपलं प्रदूषण कमी करु. आपण इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी यांचा वापर करण्याची गरज आहे. पुण्यात ऑटो रिक्षा, स्कूटर या ताबडतोब इथेनॉलवर चालवाव्यात, असा माझा सातत्यानं आग्रह आहे. पंतप्रधानांनी दोन पेट्रोल पंपांचं उद्घाटनही केलं आहे. त्यामुळे याबाबत महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेतला, तर कोरोनाच्या काळातही ग्रोथ रेट वाढण्यास मदत होईल.", असं ते म्हणाले.
दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन फक्त एबीपी माझावर
राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमिवर एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री सुभाष देसाई या नेत्यांसह बाबा रामदेव, अभिनेते सचिन पिळगावकर, खेळाडू अंजली भागवत, उद्योजक अरुण फिरोदिया, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या आपलं व्हिजन मांडणार आहेत.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि हॉटस्टारवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.
एबीपी माझा युट्यूब लाईव्ह : https://www.youtube.com/watch?v=I6zGBF72o7M
फेसबुक पेज : https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर हँडल : https://twitter.com/abpmajhatv