Majha Maharashtra Majha Vision | 43 पैकी 38 मंत्र्यांवर कर्ज; कुटुंबासाठी कर्ज घेता, पण जनतेसाठी कर्ज घेताना तत्त्वज्ञान आठवतं : सुधीर मुनगंटीवार
#MajhaVision2020 : एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात भाजपचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. स्वत:च्या कुटुंबासाठी कर्ज घेऊ शकता, राज्यातील गोरगरीब जनतेसाठी कर्ज घेताना तत्त्वज्ञान आठवतं, असं मुनगंटीवार म्हणाले.
Majha Maharashtra Majha Vision 2020 : " मुख्यमंत्र्यांसह राज्यातील 43 पैकी 38 मंत्र्यांवर कर्ज आहे. तुम्ही स्वत:च्या कुटुंबासाठी कर्ज घेऊ शकता, राज्यातील गोरगरीब जनतेसाठी कर्ज घेताना तत्त्वज्ञान आठवतं, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केली. तसंच "राज्य सरकारची जबाबदारी शून्य असते हा नवा शोध लागला. ही अजब सरकारची गजब कहाणी आहे," अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या कामगिरीवर भाष्य केलं. सोबतच सरकारला अपमान करुन घ्यायची सवय लागली आहे, असंही ते म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
'38 मंत्र्यांवर कर्ज, कुटुंबासाठी कर्ज घेता, पण जनतेसाठी कर्ज घेताना तत्त्वज्ञान आठवतं' सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. आधीच कर्जाचा डोंगर असल्यामुळे आणखी कर्ज घेता येणार नाही असं सरकारकडून वारंवार सांगितलं जातं. यावरुन सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "सरकारने उत्तम शिक्षणाची सोय केली नाही तरी सामान्य ज्ञान बिघडवता कामा नाही. केंद्र सरकारने 13 नोव्हेंबरपर्यंत विविध माध्यमातून 68,209. 41 कोटी दिले आहेत. कर्ज घेणार नाही असं राज्य सरकार म्हणतं. 43 मंत्र्यांपैकी 38 मंत्र्यांनी कर्ज घेतल्याचं प्रतिज्ञांपत्रात म्हटलं आहे. स्वत: उद्धव ठाकरेंनी 15 कोटींचं 50 लाखांचं कर्ज आहे. तुम्ही स्वत:च्या कुटुंबासाठी कर्ज घेऊ शकता, राज्यातील गोरगरीब जनतेसाठी तत्त्वज्ञान आठवतं. या संकटात महाराष्ट्राला कर्ज घ्यायला काय अडचण आली असती. एक लाख कोटींचं डिपॉझिट महाराष्ट्रात आहे. ते डिपॉझिट जनतेचे आहेत. तुमच्याकडे निर्णयक्षमता नाही. तुम्हाला कंगनाचा बदला घ्यायचा आहे. तुम्हाला अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकायचंय. तुम्हा विरोधकांना शिंगावर घ्यायचंय
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं नरेंद्र मोदी यांनी चार जाहीर सभांमध्येही सांगितलं होतं. 24 ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत तुम्ही सांगता की शब्द दिला होता. या सत्तेचा पाया मुळातच जनतेचा विश्वासघाताने रचला आहे. एक कोटीही मतं जनतेने शिवसेनेला दिली नाहीत. यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी सभ्यतेचे मर्यादा ओलांडली नाही. हात धुवून मागे लागणे, शिंगावर घेऊ असं वक्तव्ये करुन स्वत:ची प्रतिमा खराब करुन घेत आहेत. शरद पवारांनीही कधी अशा शब्दाचा उपयोग केला नाही. सरकारला अपमान करुन घ्यायची सवय लागली आहे.दिवसभर दिग्गज नेत्यांचं महाराष्ट्रासाठीचं व्हिजन फक्त एबीपी माझावर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारमधील मंत्र्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांचं महाराष्ट्रासाठी व्हिजन काय हे आज दिवसभरात जाणून घेण्याचा एबीपी माझाचा प्रयत्न आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांचा सहभाग असणार आहे. हे नेते महाराष्ट्रासाठीचं त्याचं व्हिजन मांडणार एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात मांडणार आहेत.
'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेजवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.