Majha Katta: मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत 'वज्र'फूट पडणार का? 'माझा कट्ट्या'वर नाना पटोले यांचं रोखठोक मत
मुख्यमंत्रीपदामुळे युतीमध्ये फूट पडली त्याच मुद्द्यावरून विरोधकांमध्ये वज्रफूट तर पडणार नाही ना? अशाच आशयाचा प्रश्न नाना पटोले यांना विचारला असता, पटोलेंनी त्याचं रोखठोक उत्तर दिलं आहे.
Majha Katta: नाना आणि वाद... असं काहीसं समीकरण आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच बघायला मिळतं. नाना पटोले (Nana Patole) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चांगलेच प्रसिद्ध आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी 'माझा कट्टा'ला विशेष मुलाखत दिली. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात नाना पटोले यांनी सर्वच प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. एकीकडे सत्ताधारी भाजपविरोधात विरोधक वज्रमूठ आवळत असताना राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची नाना पटोले यांनी पाठराखण केली आहे. 2014 आणि 2019 मधील निवडणुकांमध्ये विरोधकांची मोट बांधण्यात महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष अपयशी ठरले पण आता पाणी डोक्यावरून गेलं आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
महाविकास आघाडीतील जबाबदार आणि मोठ्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून 'मविआ'त धुसफूस सुरू असल्याचं समोर येत आहे. सत्ता संपुष्टात येताच उद्धव ठाकरे गटाने सावरकरांविषयी आपली भूमिका मांडत थेट राहुल गांधी यांना इशारा दिला होता. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एबीपी माझाच्या एका मुलाखतीत नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावरून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल सुरू आहे का? अशी शंका निर्माण होते.
माझा कट्टाच्या कार्यक्रमात नाना पटोले यांनी मात्र एक मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप करत असलेल्या राजकारणामुळे आता पाणी डोक्यावरून गेलं आहे, त्यामुळे आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत आणि 2024 पर्यंत एकत्र राहणार आहोत, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यातच एका प्रश्नाला उत्तर देत असताना, नाना पटोले यांनी मोठा खुलासा केला आहे. ज्या मुख्यमंत्रीपदामुळे युतीमध्ये फूट पडली त्याच मुद्द्यावरून विरोधकांमध्ये वज्रफूट तर पडणार नाही ना? अशाच आशयाचा प्रश्न नाना पटोले यांना विचारला असता, पटोलेंनी त्याचं रोखठोक उत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीत ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याच पक्षाचा मुख्यमंत्री, असं मोठं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. त्याबरोबर 2019 मध्ये जो कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला होता, त्याचे ठराविक मुद्देही त्यांनी 'माझा कट्ट्या'वर विस्तृतपणे सांगितले आहे.
नागपूर शहरात सद्भावना नगर येथे वज्रमूठ सभा
नागपूर शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर ही सभा होणार असून, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.