(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Impact : आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीची चौकशी होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश
Majha Impact : शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या काळात झाला आहे. मात्र विजय वडेट्टीवार यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे.
मुंबई : कोरोना काळात (Coronavirus) वित्त विभागाचा विरोध असतानाही मदत व पुनर्वसन विभागाने विभागाने शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. बाजारभावाप्रमाणे 25 ते 30 लाखात मिळणारे वाहन आणि साहित्य तब्बल या विभागाने तीन कोटीच्या घरात खरेदी केल्याचा प्रताप या विभागाने केल्याची बातमी एबीपी माझाने प्रसारित केल्यांतर त्याची दखल (Majha Impact) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून घेण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीची चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सुधीर मुनगंटीवारांची एसआयटी चौकशीची मागणी
एबीपी माझाच्या बातमीनंतर देवदूत बस घोटाळा प्रकरणात कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. पुढील कॅबिनेट बैठकीत याबाबत प्रस्ताव देखील मांडणार असल्याची माहिती मुनगंटीवारांनी दिली आहे
विजय वडेट्टीवार यांनी हे सगळे आरोप फेटाळले
शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याचा निर्णय तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या काळात झाला आहे. मात्र विजय वडेट्टीवार यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे. वडेट्टीवार म्हणाले, 2014 च्या युती सरकारनं खरेदी केलेल्या किंमतीतच बसेस खरेदी केल्या असून फक्त जीएसटी वाढल्यानं युती सरकारच्या तुलनेत काही प्रमाणात किंमती वाढल्या आहेत. याबाबत काही कागदपत्रं देखील विजय वडेट्टीवार यांनी समोर आणली आहेत.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रात कुठे नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती आली तर अशा वेळी तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी शीघ्र प्रतिसाद या विशेष वाहनाची योजना आणली. मात्र राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने खरेदी केलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 25 ते 30 लाख रुपये किंमत असलेली शीघ्र प्रतिसाद वाहनांची खरेदी तब्बल एक कोटी 94 लाखात केली आहे. मेंटेनन्ससह ही एक गाडी तीन कोटी रुपयांना खरेदी करण्यात आल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती लागले आहे.