राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरुच, माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार
मंत्रीमंडळात स्थान न निळाल्याने राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्यासह काही नेते पक्षावर नाराज आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची भर पडली आहे.
बीड : राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने महाविकास आघाडीमधील नाराज नेत्यांची यादी आता वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार मकरंद पाटील आणि राहुल चव्हाण यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेदेखील पक्षावर नाराज असल्याचे समोर येत आहे
प्रकाश सोळंके हे चौथ्यांदा माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. तरिही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने सोळंके नाराज आहेत. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत संभाव्य मंत्रीमंडळाच्या यादीमध्ये सोळंके यांचे नाव असल्याचे सांगितले जात होते. मात्र बारा वाजता यादी जाहीर झाली, त्यामध्ये त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे नाराज झालेले सोळंके मुंबईहून निघून थेट पुण्यात पोहोचले.
विशेष म्हणजे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घातली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनादेखील याबाबत माहिती मिळाली आहे.
पक्षात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना मंत्री केले जात आहे. मात्र मी चार वेळा निवडून आलो आहे, तरीसुद्धा मला मंत्री केले जात नाही, असे प्रकाश सोळंके यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे
प्रकाश सोळंके यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांना विधानसभा अध्यक्षांनी उद्या दुपारी 12 वाजताची वेळ दिली आहे. त्यामुळे प्रकाश सोळंके हे उद्या 12 वाजता विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शपथविधीनंतर तिन्ही पक्षात नाराजीचा सूर, शिवसनेचे राऊत, सावंत, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पक्षावर नराज?प्रकाश सोळंके हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली असून त्यांचे कार्यकर्ते माजलगावाहून पुण्याकडे निघाले आहेत. विशेष म्हणजे आज माजलगाव, वडवणी आणि धारुर या तीन पंचायत समितींच्या सभापतीपदी सोळंके गटातील नेत्यांची निवड झाली आहे. हे तिन्ही सभापती त्यांच्या पदांचा राजीनामा सोळंके यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.
मंत्रिपदावरुन राष्ट्रवादीत नाराजीनाट्य, वाईचे आमदार मकरंद पाटलांना डावलल्याने समर्थकांचे राजीनामेयेत्या चार दिवसात बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत सोळंके गटाचे सर्वात जास्त म्हणजेच आठ सदस्य आहेत. सोळंके यांना मंत्रीपद न मिळाल्याने आठ जिल्हा परिषद सदस्यांनी सोळंके यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या बीड जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सोळंकेंच्या नाराजीचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे
व्हिडीओ पाहा : भावाला मंत्रिपद न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याची चर्चा | ABP Majha