शपथविधीनंतर तिन्ही पक्षात नाराजीचा सूर, शिवसनेचे राऊत, सावंत, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण पक्षावर नराज?
ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे.
मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा आज (30 डिसेंबर) विधीमंडळ परिसरात पार पडला झाला. एकूण 36 आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे यांच्यासह 26 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर दहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याचदरम्यान तीनही पक्षांमधील काही नेत्यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे हे नेते पक्षांवर नाराज आहेत. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते नाराज नेत्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवसेनेत नाराजी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे शिवसेना खासदार संजय राऊत पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज मंत्रिमंडळाच्या विस्तारालाही संजय राऊत यांनी दांडी मारली. मंत्रिमंडळ विस्तारात बंधू आमदार सुनील राऊत यांना स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत आपली नाराजी उघडपणे दाखवत नसले तरी उद्धव ठाकरेंसोबत ते याबद्दल चर्चा करण्याची शक्यता आहे. मी शासकीय कार्यक्रमाला जात नाही असं सांगून संजय राऊतांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊतही शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित होते. त्यांचा फोनही स्विच ऑफ आहे. मंत्रीपद न मिळाल्याने सुनील राऊत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचीही चर्चा आहे.
शिवसेना नेते तानाजी सावंतही पक्षावर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीच्या सात-आठ महिने आधी तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. यावेळी तानाजी सावंतांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून सावंत उस्मानाबादमध्ये शिवसेनेची मोट बांधत आहेत. त्यांना यावेळी मंत्रीपद मिळेल, असे बोलले जात होते. परंतु मंत्रीमंडळात त्यांचा समावेश न झाल्याने ते शिवसेनेवर नाराज आहेत.
राष्ट्रवादी पक्षात नाराजी महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारापासून राष्ट्रवादीत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा मंत्रीमंडळात समावेश झालेला नाही. त्यामुळे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंकरंद पाटील यांना डावलल्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. लोणंद ,वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह तब्बल आठ जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसमध्ये नाराजी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार प्रणिती शिंदे, नसीम खान, अमीन पटेल आणि संग्राम थोपटे या नेत्यांचा गट काँग्रेसवर नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीपूर्वी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना मंत्रीमंडळात संधी मिळाली असून, पक्षनिष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे, असा सूर काँग्रेस नेते आळवू लागले आहेत. मंत्र्यांची यादी तयार करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि दिल्लीतल्या इतर प्रमुख नेत्यांची दिशाभूल करण्यात आल्याचेही नाराज गटाकडून बोलले जात आहे. हे नेते लवकरच सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आपण पक्षावर नाराज नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष नाराज महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष महाराष्ट्र विकास आघाडीवर नाराज आहेत. मित्रपक्षांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण नसल्याने स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. बहुजन विकास आघाडी, आरपीआयचा जोगेंद्र कवाडे गट हे सगळे मित्रपक्ष महाविकास आघाडीवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
मंत्र्यांची यादी
शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (मुंबई) अनिल परब (मुंबई) उदय सामंत (रत्नागिरी) गुलाबराव पाटील (जळगाव) दादा भुसे (मालेगाव, नाशिक) संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ) संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद) शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर) अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद) राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर) शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा) बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती) काँग्रेसचे मंत्री के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार) अशोक चव्हाण (नांदेड) अमित देशमुख (लातूर) यशोमती ठाकूर (अमरावती) विजय वड्डेटीवार (चंद्रपूर) सुनील केदार (नागपूर) अस्लम शेख (मुंबई) वर्षा गायकवाड (मुंबई) सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर) विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली) राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे) दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे) धनंजय मुंडे (परळी, बीड) अनिल देशमुख (नागपूर) डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखे़ड राजा, बुलडाणा) हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर) जितेंद्र आव्हाड (ठाणे) नवाब मलिक (मुंबई) बाळासाहेब पाटील (कराड, सातारा) राजेश टोपे (अंबड, जालना) प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर) दत्ता भरणे (राज्यमंत्री) (इंदापूर) अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री) (उदगीर, लातूर) मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे शपथ घेतो की... | ABP Majha