(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाशिवरात्रीवरही कोरोनाचं सावट, कोकणातील 'हे' मंदिर भाविकांसाठी बंद, शिवरात्री उत्सवही रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 ते 14 मार्चपर्यंत कुणकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय कुणकेश्वर देवस्थान समितीने घेतला आहे.या काळात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग : कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या देवगड मधील कुणकेश्वर मंदिर महाशिवरात्री पासून तीन दिवस भक्तांसाठी बंद असणार आहे. महाशिवरात्रीवर कोरोनामुळे निर्बंध आले आहेत. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टने यावर्षी महाशिवरात्री उत्सव साध्या पध्दतीने तसेच कोरोनाचे नियम व अटींनुसारच साजरा कराव असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाला येऊन वर्ष लोटलं तरीही अनेक सणांवरील कोरोनाचं सावट काही जाता जात नाहीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी 11 मार्चला होणारा महाशिवरात्रीचा उत्सवही रद्द करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 ते 14 मार्चपर्यंत कुणकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय कुणकेश्वर देवस्थान समितीने घेतला आहे. इतकंच नाही तर कुणकेश्वरमध्ये 10 ते 14 मार्चपर्यंत कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
मंदिर भाविकांसाठी बंद असलं तरी नियमित होणारी पूजा आणि महाशिवरात्रीनिमित्त होणारी पूजा होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील देवगड मधील कुणकेश्वर, आंबोली मधील हिरण्यकेशी, कुडाळ नेरूर मधील कलेश्वर याठिकाणी महाशिवरात्र साध्या पध्दतीने साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील कुंणकेश्वर हे मंदिर पांडव कालीन पुरातन मंदिर आहे. पांडवांनी या मंदिराला दक्षिण काशीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील खुणा आजही या गावात आहेत. कुणकेश्वर गावच्या समुद्र किनारी वसलेले हे मंदिर पांडवकालीन तसेच शिवकालीन इतिहास असलेले प्राचीन मंदिर आहे. दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या कुणकेश्वरला महाशिवरात्रीपासून पुढील तीन दिवस भक्तांची मांदियाळी पहायला मिळते. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे साध्या पध्दतीने व मर्यादित स्वरूपात धार्मिक विधी पार पडणार आहे.
कोकणच्या निसर्गाने पर्यटकाना वेड कायमचं असते. त्यामुळे समुद्र काठी वसलेल्या या मंदिराला जिल्ह्यातील नव्हे तर देश विदेशातील पर्यटकही भेट देतात. श्री क्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे संबोधतात. काशी येथे 108 शिवलिंगे आहेत, तर कुणकेश्वर येथे 107 शिवलिंगे आहेत. मात्र, ही शिवलिंगे समुदाच्या काठावर असल्यामुळे ही ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात. या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगांमुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते. गेली कित्येक वर्षे या शिवलिंगांवर समुद्रातील लाटांचा बाराही महिने मारा चालू असतो. तरीही शिवलिंगे झिजलेली नाहीत. सध्या केवळ 5-6 ठिकाणी शिवलिंगे पाण्याच्या ओहोटीच्या वेळी दृष्टीस पडतात. अशा प्रकारची खडकांवरील शिवलिंगे काशी या तीर्थस्थळावरही आहेत. श्री देव कुणकेश्वराचे स्थान इ.स. 11व्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते. जवळजवळ 350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचे सांगितले जाते.
दरवर्षी कुणकेश्वर यात्रेला सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. कुणकेश्वर मंदिरात तीन दिवस यात्रा सुरु असते. तिसऱ्या दिवशी कुणकेश्वर मध्ये अनेक गावातील ग्रामदैवत कुणकेश्वराच्या किनाऱ्यावर स्नान करण्यासाठी पहाटेच्या वेळी हजारोंच्या संख्येने गर्दी करतात. मात्र, यावर्षी कुणकेश्वर यात्रा मर्यादित स्वरूपाची असणार आहे. कुणकेश्वर यात्रेला भाविकांना बंदी आहे. पुजारी, देवस्थान ट्रस्ट, मानकरी यांच्या उपस्थितीत यावर्षी कुणकेश्वर यात्रा साजरी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.