Maharashtra Weather : राज्यात थंडीचा जोर वाढणार, ख्रिसमसवेळी मात्र तापमानात वाढ; कसं असेल राज्यातील हवामान?
IMD Forecast : आज आणि उद्या राज्यातील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून त्यानंतर राज्यातील तापमान वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस थंडी (Cold Weather) वाढणार असून हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. ख्रिसमसदरम्यान महाराष्ट्रातील तापमान वाढण्याचा अंदाज आहे. आज आणि उद्या राज्यातील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून त्यानंतर राज्यातील तापमान वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
पुढील सहा दिवस राज्यात कोरडं हवामान
आज 20 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. यासोबतच पुढील सहा दिवस राज्यात कोरडं हवामान राहिल. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात जाणवताना दिसणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसात महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी 25 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात हवामान कोरडं दिसून येईल.
कुठे पाऊस तर कुठे थंडीची लाट
देशात कुठे पाऊस तर कुठे थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरस्थितीमुळे रेल्वे सेवेसह राज्यातील दळणवळण सेवाही विस्कळीत झाली आहे. दक्षिण रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
नाताळनंतर थंडी वाढणार
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे बुधवारी आणि गुरुवारी राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तासात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर मात्र, राज्यातील तापमानात वाढ होणार आहे. नाताळच्या दरम्यान राज्यात उबदार वातावरण पाहायला मिळेल आणिं थंडी कमी असेल. 28 डिसेंबरनंतर राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.