Maharashtra Weather Today : कुठे अवकाळीचा अंदाज, तर कुठे उन्हाने लाहीलाही; राज्यातील हवामानाची स्थिती काय?
Maharashtra Weather Today : राज्यात आज अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर आणि जळगावमध्येही 40 पार तापमानाची नोंद झाली.
मुंबई : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) तापमान (Temperature) सध्या वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच कुठे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) देखील हजेरी लावल्याचं चित्र आहे. पण पावसाने जरी हजेरी लावली तरी हवेत मात्र गारवा निर्माण झाला नाहीये. विदर्भातील तापमानाने तर 40 अंशाचा केव्हाच पार केलं आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र आहे.
त्यातच विदर्भातील कमाल तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचं देखील तापमान वाढलं आहे. शुक्रवार 19 एप्रिल रोजी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अकोल्यात आजच्या दिवशी 44 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले आहे. आजच्या दिवसासाठी हवामान विभागाकडून रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता.
चंद्रपूर जळगावसह मुंबईचाही पारा वाढला
चंद्रपुरात आजच्या दिवशी 43.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जळगावात 43.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील तापमान हे आजच्या दिवसाला 33 अंश सेल्सियसवर होते, तर ठाणे जिल्ह्याचे 37 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.
राज्यातील जिल्ह्यांची कमाल तापमानाची आकडेवारी
(अंश सेल्सियसमध्ये)
अकोला - 44
चंद्रपूर - 43.8
वाशिम - 43.6
नागपूर - 41.4
जळगाव - 43.2
जेऊर - 42.5
परभणी - 42.2
नांदेड - 41
मालेगाव - 42
संभाजीनगर - 40.9
सांताक्रुज - 347.8
कुलाबा - 33.7
ठाणे - 37
डहाणू - 36.3
राज्यात अवकाळी पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून आजच्या दिवसासाठी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये गारपीटाचा देखील इशारा देण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या सरी बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं होतं.
देशातील हवामानाची स्थिती काय?
महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये आणि पूर्व उत्तरेकडील काही भागांमध्ये कमाल तापमान 42 ते 44 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, झारखंड ते पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये 40 -42 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.