Maharashtra Rain Live updates : मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
Maharashtra Rain Live updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागात हलक्या पावसानं हजेरी लावली आहे.
राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी
राज्यातील नागपूर, मुंबईतील वांद्रे, दादर आणि ठाणे परिसरात हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.
कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत, पेरण्या खोळंबल्या
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकं वाया गेली आहेत.
बीड जिल्ह्यातील शिरूर गेवराई आणि केज तालुक्यामध्ये पावसाची हजेरी
Beed Rain : बीड जिल्ह्यातील शिरूर गेवराई आणि केज तालुक्यामध्ये मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून केज तालुक्यातल्या माळेगाव आणि युसूफवडगाव या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला होता.. तर या मुसळधार पावसामध्ये माळेगाव येथे वीज पडून एक गाय ठार झाले असून वडगाव येथील एक म्हैस पुरात वाहून गेली आहे..
Monsoon News : मुंबईसह दिल्लीत मान्सून सक्रिय, हवामान विभागाची घोषणा
Monsoon News : मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत (Delhi) मान्सून सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आली आहे. मुंबईत 11 जून रोजी मान्सून दाखल होण्याची तारीख आहे. तर दिल्लीत 27 जून रोजी मान्सून दाखल होत असतो. मात्र, यावर्षी मुंबईत 14 दिवस उशिराने मान्सून दाखल झाला आहे तर दिल्लीत दोन दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे.
Mumbai Rain : पावसात मुंबईकरांचा एन्जॉय, फुटबॉल खेळत तरुणांनी लुटला आनंद
Mumbai Rain : मुंबईत पाऊस पडला की मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असतात हे सर्वांनाच माहित आहे .मात्र याच पावसात मुंबईकर एन्जॉयही करत असतात. तेच दृश्य आज मुंबईत पहिल्या पावसानिमित्ताने मुंबईत गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळत आहे. पहिल्या पावसात फुटबॉल खेळत, तरुण आनंद लुटत आहेत
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस, महाबळेश्वरमध्ये 115 मिलिमीटर पावसाची नोंद
Satara Rain : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. कोयना धरणाला उपयुक्त असणाऱ्या महाबळेश्वरात तब्बल 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयनेमध्ये 14 आणि नवजा परिसरात 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळं धरणात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. 24 तासातील समाधानकारक पावसाने आशा पल्लवीत झाल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
Bhandra Rain : सुमारे 15 दिवस मृगाच्या पावसानं हुलकावणी दिल्यानंतर गुरुवारपासून भंडारा जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. शेतकरी बांधवांनी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून पावसाच्या प्रतीक्षेत होते. आता पावसाचे आगमन झाले असून शेतकरी बंधवांची बी - बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.