(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather Forecast: राज्याचा पारा वाढला, अनेक जिल्ह्यात तापमान चाळीशी पार; मोखा चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट
Weather Forecast: विदर्भात आज सगळ्याच जिल्ह्यात तापमानाने चाळीशीचा पारा ओलांडला.
Weather Forecast: पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा चक्रीवादळात (Cyclone Mocha) रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम होणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोखा चक्रीवादळाचा परिणाम होणार नसल्याने राज्यात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यतादेखील नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे आज राज्यातील कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
'मोखा' या चक्रीवादळामुळे बांगलादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारमधील सिटवे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमानमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज रात्री या वादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. 13 मे रोजी सायंकाळी चक्रीवादळ अति तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14 मे रोजी सकाळी वादळाचा जोर ओसरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने सांगितले की, 11 आणि 12 मे रोजी पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. याशिवाय राजस्थानमध्ये 12 ते 13 मे दरम्यान, कोस्टल आंध्र प्रदेशमध्ये 13 ते 15 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व भारत वगळता इतर सर्वत्र पुढील तीन दिवस कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकमधील काही भाग, तामिळनाडू, पाँडिचेरीमध्ये 11 आणि 12 मे रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात उन्हाचा तडाखा
आज राज्यातील कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली. बहुतेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक नोंदवण्यात आले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार होते. अकोला आणि वर्ध्यात आज सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद
राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ (अंश सेल्सिअसमध्ये)
सोलापूर - 41.5
कोल्हापूर - 37.1
बारामती - 40
नाशिक - 40.7
महाबळेश्वर - 33.5
अलिबाग - 36
सातारा - 39.3
जळगाव - 44.8
छत्रपती संभाजीनगर - 41.4
सांगली - 38.5
उदगीर - 38.3
ठाणे - 39.9
पुणे - 41
रत्नागिरी - 34.8
सांताक्रुज - 36.9
नांदेड - 42.8
धाराशीव - 40.6
जालना - 42.8
बीड - 41.9