(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा; धार्मिक स्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत लवकरच घोषणा?
Maharashtra Unlock : मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. हॉटेल-रेस्टॉरंट-मॉल यांसाठी टप्प्याटप्यानं शिथिलता देण्याबाबत विचार झाला आहे.
मुंबई : सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडली. सध्या राज्यांत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशातच लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभाही देण्यात आली आहे. अशातच धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. तसेच, हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले होतं. काल (सोमवारी) पार पडलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली असून यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून राज्यातील अनेक भागांत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मुंबईतही अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मुंबई लोकलबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलताना मोठी घोषणा केली. मुंबई लोकल कधी सुरु होणार, याबाबत मुंबईकरांकडून प्रशासनाला अनेक प्रश्न विचारले जात होते. अशातच 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
देशासह राज्याच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. या अनुषंगानं राज्यात अनेक उपाय-योजनाही केल्या जात आहे. तसेच निर्बंध शिथील करतानाही तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेतली जात आहे. यासंदर्भातही टास्क फोर्सच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा पार पडली. तिसऱ्या लाटेची शक्यता आणि सध्याची कोरोनाबाधितांची संख्या या सर्वांचा सारासार विचार करुनच राज्यातील धार्मिक स्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी बोलताना सांगितल्यानुसार, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.
टास्क फोर्सच्या बैठकीत काल नेमकी काय चर्चा झाली?
हॉटेल- रेस्टॉरंट आणि मॉल खुले करण्यासंदर्भात बैठकीत सखोल चर्चा झाली.
हॉटेल-रेस्टॉरंट-मॉल यांसाठी टप्प्याटप्यानं शिथिलता देण्याबाबत विचार झाला.
हॉटेल - रेस्टॉरंटला रात्री 10 पर्यंत शिथीलता देता येऊ शकेल. मात्र, त्यासाठी काटेकोर नियमावली तयार होणार
त्यानंतर मॉल खुले करण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो. मात्र त्यासाठीही काटेकोर नियमांची अंमलबजावणी आवश्यकता आहे.
धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळं, सामाजिक कार्यक्रम याकरता लगेच शिथीलता देता येणार नाही, असं मत मांडण्यात आलं.
शिथिलीकरणासंदर्भातली नियमावली टास्क फोर्स तयार करेल आणि ती मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांसमोर सादर होईल.
तिसरी लाट कधी येऊ शकते? राज्याची तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी आहे का?
नियम शिथिल केले तर काय परिणाम होऊ शकतात? लसपुरवठाही अपुरा पडतोय. या सर्व बाबींचा विचार करुन निर्णय होणार आहे.
15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार
15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबत घोषणा केली. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांमधून फोटो पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यू आर कोड असतील असेही ते म्हणाले.