(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आजपासून राज्यात अनलॉक! तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये? स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीनुसार काय सुरु काय बंद?
आज 7 मे पासून राज्यात अनलॉक सुरु होत आहे. हे अनलॉक सरसकट नसून स्तरनिहाय होणार आहे. यात तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये आहे? स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीनुसार काय सुरु काय बंद? वाचा.
मुंबई - जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे. यानुसार तुमचा जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये आहे? स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीनुसार काय सुरू? काय बंद? वाचा..
सांगली
सांगली जिल्ह्याचा समावेश हा चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी आला असला तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आजही आयसीयूमध्ये 200 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जर पूर्ण लॉकडाऊन उठवला तर पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. व्यापाऱ्यांनी आमच्याकडे मागणी केली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत आमचा सकारात्मक विचार आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणखी कमी आला की येत्या दोन दिवसात पुन्हा बैठक घेऊन अनलॉकबाबत निर्णय घेऊ असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
पालघर
पालघर जिल्ह्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून काही रुग्णांचा मृत्यू होत आहे पालघर जिल्हा तिसऱ्या श्रेणीत असून जिल्ह्यावर असलेले निर्बंध कायम आहेत. शनिवार, रविवार पूर्णपणे टाळेबंदी असून इतर दिवशी अत्यावश्यक सेवा आणि ठराविक दुकानं सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू आहेत तर सलून, स्पा आणि जिम पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यामुळे अजुनही जिल्हा प्रशासनाकडून कोणताही निर्णय अनलॉकबद्दल जाहीर करण्यात आलेला नाही.
वर्धा
वर्धा जिल्हा सध्या लेव्हल तीनमध्ये असल्यानं मोठ्या प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकान, व्यवसाय दररोज सकाळी 7 ते 4 तर इतर सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 4 वाजतापर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. मात्र, मॉल, चित्रपट, नाट्यगृहे बंद असणार आहेत.
बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1% पेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात सध्या लेव्हल 3 लागू आहे. त्यामुळे आता मंदिरं सुरू करून या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या व्यावसायिकांकडून होत आहे.
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा 12.70 टक्के असून ऑक्सिजन बेड्स व्यापलेली टक्केवारी 66.65 टक्के इतकी असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शासनाकडील आदेशान्वये चौथ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. त्यानुसार साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील अधिकारास अनुसरून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार 7 जून पासून पूर्ण अनलॉक होणार नाही.
पुणे
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. पुण्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने राज्यशासनच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहे. तर सलून, ब्यूटीपार्लरसह बंद असलेली खेळाची मैदाने आणि उद्याने पुन्हा उघडणार आहे. या सुधारित नियमांची अंमलबजावणी सोमवार( 7 जून) पासून करण्यात येणार आहे. तर संपूर्ण पुणे जिल्हा लेव्हल 3 आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका वगळून पुणे जिल्हा लेव्हल 4 येत आहे.
मुंबई
मुंबई महापालिकेने अनलॅाकची नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या गाईडलाईनद्वारे मुबंई लेवल तीनमध्ये आहेत. मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट 5.30 टक्के आहे. मात्र पुढच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुधारणा होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यासाठी इतर महापालिकांसोबत चर्चा करुन मुंबई महापालिका नवी नियमावलीही जारी करण्याची शक्यता आहे.
- औरंगाबाद शहर पहिल्या लेव्हलमध्ये आहे तर ग्रामीण दुसऱ्या लेव्हलमध्ये आहे.
- पिंपरी चिंचवड महापालिका 5 ते 10 टक्के दर या गटात येत आहे.
- सोलापूर महानगरपालिका दुसऱ्या तर सोलापूर ग्रामीण हद्द तिसऱ्या लेव्हलमध्ये.
- कोल्हापूर महापालिकेचा लेव्हल 4 मध्ये समावेश.
- सातारा जिल्हा लेव्हल 4 मध्ये.