Tirthatan Yojana : मुख्यमंत्री तीर्थस्थळ दर्शन योजनेचे अर्जदार सहा महिन्यापासून प्रतीक्षेत, ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन मिळणार का?
Maharashtra Tirthatan Yojana : विधानसभेपूर्वी सुरू करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तीर्थ दर्शन योजनेची सध्याची स्थिती काय आहे याची स्पष्ट माहिती नाही.

ठाणे : एखाद्या मोठ्या परीक्षेला जाताना आपण ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतो, अशाच प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठांचे मतदानातून आशीर्वाद घेतले आणि सरकार स्थापन केले. मात्र विधानसभेची परीक्षा पास झाल्यानंतर सरकार जेष्ठांना विसरले का असा प्रश्न राज्यातील ज्येष्ठ नागरिक विचारत आहेत. कारण या योजनेच्या उर्वरित अर्जदारांना सहा महिने उलटले तरी योजनेचा लाभच मिळत नाही आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना राज्यातील 66 आणि देशातील 73 तीर्थस्थळांना मोफत पर्यटन घडवणार होते. महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा मोफत प्रचार करण्यासाठी मुंबईतील प्रभादेवी इथे राहणाऱ्या 71 वर्षीय जयराम वैद्य यांनी सामाजिक बांधिलकीतून आपल्या परिसरातील 24 वृद्ध नागरिकांचे अर्ज भरले. त्यांनी 1 ऑक्टोबर 2024 रोजी चेंबूरच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयात अर्ज सादर केले. त्यांना सांगण्यात आलं की प्रक्रिया सुरू आहे. पण सहा महिने उलटले तरी काहीही उत्तर नाही. त्यामुळे ही योजना सुरू आहे की बंद आहे, ज्येष्ठ नागरिकांना कधी मोफत तीर्थ दर्शन होणार या प्रश्नाची उत्तरे ज्येष्ठांना हवी आहेत.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नेमकी काय होती?
या योजनेत देशातील आणि राज्यातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला होता. राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येणार होता. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती 30 हजार इतकी होती. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश होता.
या योजनेसाठी पात्रता काय होती?
- महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. वय वर्षे 60 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- या योजनेची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 होती.
या संदर्भात या योजनेच्या कारभार ज्या मुंबईतील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आहे त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 4 नोव्हेंबर 2024 रोजी अयोध्येला जाणाऱ्या एका ट्रेनमधून मुंबई आणि ठाणे येथील 800 ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेचा लाभ देण्यात आला. यामध्ये मुंबईतील 200 आणि मुंबई उपनगरातील 200 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. उर्वरित लाभार्थ्यांचे तीर्थस्थळ ठरवून त्यानुसार आम्ही नियोजन करत आहोत.
ही बातमी वाचा:
























