Maharashtra Temple Reopen : राज्यभरात मंदिरं खुली, अहमदनगरमध्ये मात्र 6 मंदिर परिसरांत जमावबंदी लागू
Maharashtra Temple Reopen : आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज मंदिरं उघडणार आहेत. मात्र अहमदनगरमध्ये मात्र 6 मंदिर परिसरांत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Navratri 2021, Maharashtra Temple Reopen : आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरं भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज राज्यभरातील मंदिरांची दारं उघडली असून भक्तांनी देवदर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील मंदिरं खुली होणार असली तर अहमदनगरमध्ये मात्र धार्मिक स्थळं सध्या खुली केली जाणार नाही. अहमदनगर जिल्ह्यात नवरात्रीच्या पूर्व संध्येला 6 मंदिर परिसरांमध्ये 144 कलम म्हणजे जमावबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात नवरात्रीच्या पूर्व संध्येला 6 मंदिर परिसरांमध्ये 144 कलम म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश काढले आहेत. पण, जमावबंदी असली तरी भक्तांना ऑनलाईन पास घेऊन दर्शन घेता येणार आहे. एक देवस्थानाच्या ठिकाणी रोज 5000 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. 7 तारखेपासून 20 ऑक्टोबरपर्यंत हे नियम लागू असणार आहेत. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिर, कर्जत तालुक्यातल्या राशीन येथील जगदंबा देवी मंदिर, केडगाव येथील रेणुका माता मंदिर, नगर एमआयडीसी येथील रेणुकामाता मंदिर, बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिर आणि नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील रेणुकामाता मंदिर या 6 मंदिर परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाची घटती प्रकरणे पाहता सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. या निमित्तानं मंदिरं सजवण्यात आली असून भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी सर्व धार्मिक स्थळे उघडली गेली. मात्रं धार्मिक स्थळं उघडताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत.
मुख्यमंत्री सहकुटुंब घेणार मुंबादेवीचं दर्शन
आज घटस्थापनेनिमित्त महाराष्ट्रातील सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी नियमांचे पालन करून भाविकांसाठी उघडली जाणार आहेत. त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे मुंबादेवीचे दर्शन सकाळी 8.30 वाजता घेणार आहेत.मुंबादेवी मंदिरात ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश असणार आहे.यासाठी मुंबादेवी मंदिराच्या वेबसाईट वर बुकिंग करता येईल.आजपासून नवरात्री उत्सव देखील सुरू होणार आहे.यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणत गर्दी होण्याची शक्यता आहे.यासाठी इथे रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बरोबर कोरोना नियमांचे पालन भाविकांकडून करून घेण्यास ही नियमावली करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Temple Reopen : आजपासून धार्मिक स्थळं भाविकांसाठी खुली, मात्र कोरोनाचे नियम पाळावे लागणार