Old Pension Scheme : NPS रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा; राज्यभर शिक्षकांची बाईक रॅली
Teachers Bike Rally : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा या मागणीसाठी बीड, परभणी, वाशिम, रत्नागिरीसह अनेक ठिकाणी शिक्षकांनी बाईक रॅली काढून निदर्शनं केली.
मुंबई: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज राज्यातील विविध ठिकाणी बाईक रॅली काढण्यात आली. बीड, वाशिम, रत्नागिरीसह राज्यातील अनेक ठिकाणच्या शिक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. येत्या काळात मागण्या पूर्ण न झाल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील या शिक्षकांनी यावेळी दिला आहे.
सन 2005 मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्याचबरोबर एनपीएस ही योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यासाठी या शिक्षकांनी आज बाईक रॅली काढली. जुन्या सरकारकडे या बद्दल अनेक वेळा मागणी केली आहे , त्यांनी आश्वासन देऊन देखील जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही. त्यामुळे नव्या सरकारने तरी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती या शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
बीडमध्ये आज शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटरसायकल रॅली काढली. गेल्या अनेक वर्षापासून मोर्चे, आंदोलन करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने संतप्त झालेल्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र घोषणाबाजी केली.येत्या काळात मागण्या पूर्ण झाल्यास थेट मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील या शिक्षकांनी राज्य सरकारला दिला आहे.
वाशिममध्ये शिक्षकांची बाईक रॅली
महाराष्ट्र राज्यातील सरकारी/निम सरकारी शिक्षेकेत्तर कर्मच्याऱ्यांना हक्काची जुनी परिभाषिक पेन्शन योजना (OPS) लागू करण्यात यावी यासाठी आणि इतर मागण्यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोटारसायकल रॅलीच आयोजन आज करण्यात आलं होतं. शहरातील विविध ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांनी आपली हक्काच्या मागणीचे फलकॉ आणि घोषणाबाजी केली. सामाजिक सुरक्षेसाठी नविन अंशदायी योजना (NPS) रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना (OPS) सर्वांना लागू करणेच हिताचे असल्याची सर्व कर्मचारी-शिक्षकांचं मत आहे. अलीकडेच राजस्थान, छत्तीसगड, गोवा या राज्यांनी तेथील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, नविन पेन्शन योजना (NPS) रथ करून, जुनी परिभाषित पेन्शन योजना (OPS) लागू केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांच्या राज्यात इतर राज्याप्रमाणे राज्यांप्रमाणे NPS बाबतचे सुधारीत धोरण महाराष्ट्र राज्यात लागू केले जावे अशी मागणी या वेळी करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात 1500 कर्मचाऱ्यांची बाईक रॅली
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केलं होतं. सामाजिक न्यायभवन ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान ही बाईक रॅली काढण्यात आली होती. जवळपास दीड हजार कर्मचारी बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.जुनी पेन्शन योजना ही 1982 सालची आहे. कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या हक्काची पेन्शन योजना होती. पण, 1 नोव्हेंबर 2005 रोजी शासनाने जुनी पेन्शन योजना रद्द करून NPS स्वरूपात नवीन योजना लागू केली. ही योजना शेअर मार्केट बेस्ड असल्याने कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात टाकणारे आहे. त्यामुळे नवीन पेन्शन योजना अर्थात NPS रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि कर्मचाऱ्यांचा हक्क शासनाने परत मिळवून द्यावा ही सर्व कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. याबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आहे.
परभणीमध्ये शिक्षकांची निदर्शनं
राज्यातील सरकारी,निम सरकारी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी जिल्हाभरातील विविध विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परभणीत दुचाकी रॅली काढत जोरदार निदर्शन केली आहेत..
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह इतर अधिकारी, कर्मचारी संघटनेने आज परभणी शहरातील जायकवाडी कॉलनी परिसरातून प्रशासकीय इमारत मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या मागण्यांचे विविध फलक दुचाकीवर लावून ही दुचाकी रॅली काढली.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर ही रॅली येऊन तिथे मोठ्या संख्येने जमलेल्या अधिकारी,कर्मचारी,शिक्षकांनी जोरदार निदर्शनं केले.