महिलांबद्दल बोलताना विचार करुन बोला, त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नका; राज्य महिला आयोगाची चंद्रकांत पाटील यांना समज
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना अपशब्द वापरले होते. त्यावर राज्य महिला आयोगाने त्यांना नोटिस पाठवली होती.
मुंबई: कोणत्याही महिलेबद्दल बोलताना विचार करुन बोला, त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नका अशी समज आज राज्य महिला आयोगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करताना राज्य महिला आयोगाला पक्ष पाठवलं होतं. त्यानंतर राज्य महिला आयोगाने त्यांना ही समज दिली आणि वादावर पडदा टाकला.
राज्य महिला आयोगाची समज
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या म्हणाल्या की, "खा.सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्य महिला आयोगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना याबाबतचा खुलासा दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले होते. चंद्रकांत पाटील यांचा खुलासा प्राप्त झाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दुःख व्यक्त करून सुप्रिया सुळे व समस्त महिलांची दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे कोणत्याही महिलेबद्दल बोलताना विचार करून बोलावे, तसेच आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये याची काळजी घ्यावी अशी समज चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेली आहे."
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
ओबीसी आरक्षणासाठी भाजपकडून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. तसेच त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, "तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा, दिल्लीत जा, नाही तर मसणात जा." चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या ?
खासदार सु्प्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, दिल्लीमध्ये कोणत्या बैठकीनंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण देण्याबाबत निकाल लागला असा दिल्लीत गेल्यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारणार असल्याचं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील यांची जीभ घसरली.