Dhananjay Munde Corona Positive : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः ट्वीट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच अनेक मंत्र्यांनााही कोरोनाची लागण झाली आहे. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत माहिती दिली की, "माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी."
दरम्यान, यापूर्वीही धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. जून 2020 मध्ये धनंजय मुंडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यासोबतच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागल्यानं मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
मिसेस मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. रश्मी ठाकरे यांनी 11 मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. 20 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्वीट करून ही माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन केले होते. मात्र आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Rashmi Thackeray Corona Positive : मुख्यमंत्र्यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, आदित्य ठाकरेंपाठोपाठ रश्मी ठाकरेही कोरोना पॉझिटिव्ह
- Maharashtra Corona Cases Update | ...तरीही राज्यात कोरोना रुग्णसंख्यावाढ कायम
- covid-19 vaccination India | 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड लस देण्याची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून केंद्राचे आभार
- Coronavirus Guidelines | कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जाहीर