शेगावच्या कुत्र्यांना कर्करोग, चर्मरोगाची लक्षणे; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शेगाव शहरातील भटक्या कुत्र्यांना कर्करोग व चर्मरोगाची लक्षणे आढळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. यावर आता ननगर परिषदेने कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाची मोहिम हाती घेतली आहे.
बुलढाणा : जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या शेगाव येथे हजारो भटक्या कुत्र्यांना कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेगावात कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्यानंतर आता नगर परिषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांची निर्बिजिकरनाची मोहिम हाती घेतली आहे. भटक्या कुत्र्यांमुळे मात्र नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय.
बुलढाणा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणे हल्ले केलेत तर बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट व रायपूर येथे अनेक लहान मुलांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला आवर घालण्यासाठी शेगाव नगरपरिषदेने कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजिकरण शस्त्रक्रिया करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
यासाठी स्पेशल कोल्हापूर येथून सेप ग्रुपला पाचारण करण्यात आल आहे. शेगाव शहरात हजारो भटकी कुत्री आहेत. बाहेरगावहुन येणाऱ्या भक्तांनादेखील त्यांचा त्रास होत आहे. धक्कादायक म्हणजे पकडलेल्या भटक्या कुत्र्यांपैकी जवळपास 271 कुत्र्यांना कर्करोग झाल्याचं सांगण्यात येत आहे तर अनेक कुत्र्यांना चर्मरोग आहे. त्यामुळे येथील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आल्याचं तज्ञ सांगतात. मात्र, नगरपरिषद प्रशासनाची चुप्पी याबद्दल बरच काही सांगून जातेय.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात शहरात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमध्ये कर्करोग, चर्मरोगाची लक्षणे आढळल्याने मानवी आरोग्यही धोक्यात आलं आहे. लहान मुलं घराबाहेर खेळत असतात अशा परिस्थितीत या कुत्र्यांच्या संपर्कात आल्याने या मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी याविरोधात तक्रारी करायला सुरुवात केली आहे. यावर आता नगरपरिषदेने हालचाली सुरु केल्यात.