(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VV karmarkar : मराठी क्रीडा पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार वी. वी. करमरकर काळाच्या पडद्याआड, महाराष्ट्रभरातून हळहळ व्यक्त
VV Karmarkar News : वि. वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक हरपले, अशा शब्दात क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी शोक व्यक्त केला आहे.
VV Karmarkar passed away : एकीकडे राजकारण आणि घडामोडीसांठी वृत्तपत्र प्रसिद्ध असताना मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान (Sports News Page) सुरू करून देशी, विदेशी खेळांना वर्तमानपत्रात क्रीडा विशेष पान देणारे मराठी क्रीडा पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार वी. वी. करमरकर (VV Karmarkar) यांचं नुकतच निधन झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वात आधी वृत्तपत्रात क्रीडा बातम्यासाठी वेगळं पान त्यांनी सुरु केल्यामुळे त्यांना "क्रीडा पानाचे जनक" म्हणूनही ओळखलं जात होतं. असे हे वी. वी करमरकर माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचकही होते. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक हरपले, ’ अशा शब्दात क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी शोक व्यक्त केला आहे.
वडीलांना त्यांना डॉक्टर करायचं होतं...
‘करमरकर मुळचे नाशिकचे. त्यांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, एमए करत करमरकरांनी पत्रकरितेची वेगळी वाट निवडली. ज्यानंतर एक उत्तम क्रीडा पत्रकार म्हणून ते नावारुपाला आले. क्रीडामंत्री महाजन यांनी शोकसंदेश देताना ही माहिती दिली. दरम्यान करमरकर यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्तही महाजन यांनी व्यक्त केली.
क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणारे पत्रकार हरपले - फडणवीस
करमरकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रभरातून शोक व्यक्त होत असून विविध राजकारणीही त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला. मराठी पत्रकारितेत क्रीडा पत्रकाराला आणि क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वि. वि. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला आहे. अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. “ करमरकर यांनी लोकांमध्ये खेळाविषयी प्रेम निर्माण व्हावे यादृष्टीने विविध उपक्रम राबवले. खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या प्रेरणेनेच मराठी दैनिकांत क्रीडा पान सुरू झाले. त्यांच्या निधनाने एक नवा प्रवाह सुरू करणारा पत्रकार आपण गमावला असं म्हणत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो,” असं फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही करमरकर यांना श्रद्धांजली वाहत 'मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला' असं म्हटलं आहे.