Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
Maharashtra CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार होणार, असे वाटत असतानाच शेवटच्या क्षणी सगळं बदलण्याची शक्यता. अमित शाहांच्या मनात काहीतरी वेगळंच असल्याची जोरदार चर्चा
मुंबई: विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. सध्या नव्या महायुती सरकारच्या स्थापनेसंदर्भातील घडामोडी वेगात सुरु आहेत. मात्र, या सगळ्यात राज्याचा आणि महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिले आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र, भाजपने एकहाती 132 जागा जिंकल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री (Maharashtra CM) बसेल, असा संदेश एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते होते. त्यामुळे बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषद घेऊन आपल्याला भाजपचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री होणार, अशी अटकळ सर्वांनी बांधली होती. मात्र, दिल्लीत बुधवारी रात्री अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. यानिमित्ताने अमित शाह यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांना पडला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात तब्बल 40 मिनिटे बैठक झाली. यावेळी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याकडून राज्यातील मराठा समाजाविषयी राजकीय समीकरणे समजावून घेतली. त्यामुळे अमित शाह यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे, याचा अंदाज कोणालाही येताना दिसत नाही. बुधवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झाल्यानंतरही अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून राज्यातील मराठा फॅक्टरची माहिती का घेतली, याविषयी आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अमित शाह हे मराठा चेहरा म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा विचार तर करत नाहीत ना, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे हे मराठा असल्यामुळे अमित शाह यांचे पारडे त्यांच्या बाजूने झुकणार तर नाही ना? मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असताना आणि भाजपचा निर्णय आपल्यासाठी शिरसावंद्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतरही अमित शाह हे आता मराठा मतांची बेरीज वजाबाकी कशासाठी करत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
एकनाथ शिंदे यांनी 2022 साली शिवसेना सोडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यानंतर महायुतीची सत्ता आली तेव्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, यावर जवळपास सर्वांनी डोळे झाकून विश्वास ठेवला होता. मात्र, ऐनवेळी दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा आदेश आला होता आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसावे लागले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा तसेच काही होणार तर नाही ना, अशी धाकधूक भाजप समर्थकांना वाटू लागली आहे.
आणखी वाचा